औरंगाबाद - महागड्या कोचिंग क्लासविना व प्रतिकूल परिस्थितीशी झगडत दहावीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवणार्या मनपा शाळांतील 22 विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी त्यांचा खास घरी मेजवानी देत सत्कार केला. या सोहळ्याला उत्स्फूर्तपणे उपस्थित राहत शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी त्यांचे कौतुक केले. एवढेच नव्हे तर यंदा राज्यातील माध्यमिक शिक्षकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात मनपाच्या शाळांतील शिक्षकांचाही समावेश केला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.
मनपा शाळांतील शिक्षणाच्या दर्जाबाबत नाके मुरडली जात असताना या शाळांतील विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली. 22 विद्यार्थ्यांनी 75 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत विशेष प्रावीण्य मिळवले. त्यांचा आज मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी व्यक्तिगत कौतुक सोहळा आयोजित केला होता. आपल्या निवासस्थानाच्या हिरवळीवर त्यांनी या गुणवंतांना आणि त्यांच्या पालकांना खास आमंत्रित केले होते व त्यांच्यासाठी खास मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते.
आयुक्तांच्या या कार्यक्रमाला शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनीही उत्स्फूर्तपणे हजेरी लावली. मग तेथे हिरवळीवर एक छोटेखानी कार्यक्रम झाला व त्यात दर्डांच्या हस्ते या गुणवंतांचा पालकांसह सत्कार करण्यात आला. या कौतुकाने भारावलेल्या विद्यार्थी व पालकांशी आयुक्तांनी मनमोकळा संवाद साधला. हिरवळीवर वर्तुळ करून जेवायला बसलेल्या विद्यार्थ्यांसोबत त्यांनी बराच वेळ गप्पा मारल्या.
शिक्षकांना प्रशिक्षण : या वेळी बोलताना राजेंद्र दर्डा म्हणाले की, राज्यात गेल्या पाच वर्षांत शालेय अभ्यासक्रमांची पुनर्रचना करण्यात आली व तो आता सीबीएसईच्या तोडीचा झाला आहे. या नव्या अभ्यासक्रमासाठी शिक्षकांना तयार करण्यासाठी गतवर्षी 60 हजार शिक्षकांना ब्रिटिश कौन्सिलच्या मदतीने इंग्रजीचे खास प्रशिक्षण देण्यात आले. आता पुढच्या टप्प्यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्राचे प्रशिक्षण देण्यासाठी आयआयटीची मदत घेतली जाणार आहे. औरंगाबाद महानगरपालिकेच्या शाळांची ही कौतुकास्पद कामगिरी बघून शिक्षकांच्या प्रशिक्षणात मनपाच्या शिक्षकांनाही सामावून घेतले जाणार आहे, अशी घोषणा त्यांनी केली.
आमचे प्रयत्न, त्यांची मेहनत : मनपा आयुक्त डॉ. कांबळे यांनी गुणवंतांचे कौतुक करताना सांगितले की, मनपा शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे, पण त्यांना मदत करणे हे आमचे कर्तव्य होते. शालेय साहित्य, अतिरिक्त वर्ग, डिसेंबरमध्ये अभ्यासक्रम संपवून सराव परीक्षा अशी आखणी करण्यात आली. मनपाने प्रयत्न केले, पण विद्यार्थ्यांनीही प्रचंड मेहनत घेतल्यामुळेच ही कामगिरी करता आली. पुढील वर्षी यापेक्षाही चांगला निकाल लागेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या विद्यार्थ्यांचा झाला गौरव
मिलिंद दाभाडे, शेख फरिना राज महंमद शेख, आमेर खान अय्युब खान, शुभम दाभाडे, शेख सुमय्या फिरोज, अश्विनी मोटे, सरस्वती वाघमारे, नाजनीन मुन्ना शेख, विनायक सुरडकर, विजय लहाने, प्रेरणा चिकाटे, विद्या धीवर, नमीरा सलीम खान, भारत जाधव, शीतल केदार, पूजा शिंदे, सुमय्या हनीफ, विनोद गिरे, शीतल वरणे, मिलिंद कांबळे, संतोष पवार, माधुरी काळे
26 जूनला बक्षीस वितरण
मनपाच्या 12 शाळांतील 386 विद्यार्थ्यांनी यंदा दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 137 विद्यार्थ्यांनी 60 टक्क्यांहून अधिक गुण मिळवले, तर 115 विद्यार्थ्यांनी 60 ते 75 टक्क्यांदरम्यान गुण मिळवले आहेत. 75 टक्क्यांहून अधिक गुण घेणार्या विद्यार्थ्यांची संख्या 22 आहे. या विद्यार्थ्यांचा 26 जून रोजी महानगरपालिकेच्या वतीने जगद्गुरू संत तुकाराम नाट्यगृहात सत्कार करण्यात येणार आहे.