आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमणावरून नगरसेवकांची आक्रमकता; तोडीपाणीचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मनपाच्या अतिक्रमण हटाव विभागात सर्रास तोडीपाणी चालते असा आरोप करीत आज जवळपास सर्वच पक्षांचे नगरसेवक हा विभाग सांभाळणारे उपायुक्त रवींद्र निकम यांच्यावर तुटून पडले. माझ्याकडून काम होत नाही असे वाटत असेल तर माझ्याकडील पदभार काढून दाखवा, असे विधान निकम यांनी करताच आगीत तेलच ओतले गेले. शेवटी अतिक्रमणांबाबत सभागृहाने दिलेल्या आदेशांचे तंतोतंत पालन झाले पाहिजे, शिवाय अतिक्रमणांबाबत असलेल्या तक्रारी पाहता याच विषयावर पाच दिवसांत विशेष सर्वसाधारण सभा घेण्याचे आदेश महापौरांना द्यावे लागले.

आज मनपाची सर्वसाधारण सभा झाली. त्यात अतिक्रमणांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश असतानाही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. राज वानखेडे यांनी तर अतिक्रमण विभाग सुपारी घेऊनच काम करीत असल्याचा आरोप करीत या विभागात बहुतेक कर्मचारी वर्षानुवर्षे काम करीत असल्याने याच विभागात सर्वात जास्त दुकानदारी सुरू आहे असे ते म्हणाले. या विभागातल्या इमारत निरीक्षकांच्या बदल्या करण्याची मागणी करूनही होत नसल्याचेही ते म्हणाले. एमआयएमचे अब्दुल नाईकवाडी यांनी सांगितले की, आपल्या वाॅर्डात इमारत निरीक्षकाने नोटीस देताना नगरसेवक अमुक अमुक यांच्या आदेशानुसार असे लिहून नोटिसा दिल्या आहेत. मनपाचे कर्मचारी अधिकारी आमचे एक काम ऐकत नाहीत, मग आमचे हे आदेश कसे काय, असा खोचक सवाल त्यांनी केला.

रामेश्वर भादवे म्हणाले की, गांधीनगरमध्ये मनपाच्या जागेवर अनधिकृत बांधकाम सुरू असताना मी तत्कालीन अतिक्रमण विभाग प्रमुख शिवाजी झनझन यांच्याकडे निवेदन दिले. प्रत्यक्ष पाहणीही केली. पण त्याचे पुढे काही झाले नाही. निकम यांच्याकडेही निवेदन दिले, पण त्यांनी यात काहीही कारवाई केली नाही. महापालिकेचा पगार घेता, मग महापालिकेचीच जागा वाचवण्यासाठी कारवाई का करीत नाहीत, असा प्रश्न त्यांनी केला. अफसर खान यांनी तर आपल्या वाॅर्डात मनपाच्या जागेचे कागदपत्र मनपाकडे नसताना मी नेऊन दिले. तिथले अतिक्रमण काढा यासाठी अनेकदा विनंत्या केल्या. पण काहीही झाले नाही, असे सांगितले.
उपमहापौर प्रमोद राठोड यांनी सुनील केंद्रेकर आयुक्त पदावर होते तोपर्यंत गजानन महाराज मंदिर रोड, सूतगिरणी चौक, शहानूरवाडी चौक आणि शहरातील इतर भागांत पुन्हा रस्त्यांवर अतिक्रमणे सुरू आहेत. नवीन आयुक्त आल्यावर कारवाई थंड का पडते, असा सवाल केला. त्यावर निकम यांना उत्तरच देता आले नाही. राजू शिंदे, अफसर खान, फिरोज खान, मीना गायके आदींनीही अतिक्रमणाचे प्रश्न उपस्थित करून उपायुक्त निकम यांना जाब विचारला.

काढून दाखवा पदभार
सभेतसदस्यांनी धारेवर धरल्यानंतर अस्वस्थ झालेल्या निकम यांनी माझ्याकडून काम होत नाही असे तुम्हाला वाटत असेल तर माझा पदभार काढून दाखवा, अशी आव्हानाची भाषा वापरली. त्यावर संतप्त होत नंदकुमार घोडेले यांनी निकम यांना शब्द मागे घेण्यास भाग पाडले. तुम्ही सभागृहात बोलत आहात, घरी नाही म्हणत एमआयएमचे नगरसेवक फिरोज खान यांनीही निकमांचा समाचार घेतला. शेवटी सभागृहाने घेतलेल्या निर्णयाची प्रशासनाने तत्काळ अंमलबजावणी करावी, असे आदेश देताना महापौर तुपे यांनी या विषयावर येत्या पाच दिवसांत विशेष सर्वसाधारण सभा घेण्याची घोषणा केली.
बातम्या आणखी आहेत...