आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्याच्या कामापुढे नगरसेवकांनी हात टेकले!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - साडेतीन कोटी रुपयांचे बजेट या जळगाव रोड ते जकात नाका रस्त्यासाठी मंजूर झाले. तथापि, मनपाची खस्ता अवस्था पाहता रस्त्याचे काम कधी सुरू होईल याची खात्री कोणताच आजघडीला संबंधित नगरसेवक देऊ शकत नाही. आम्हाला पण हा रस्ता झाला पाहिजे असे वाटते हे सांगताना मात्र इतक्या वर्षात का झाला नाही याचे उत्तरही त्यांच्याकडे नसल्याचे आणखी एक वास्तव पुढे आले आहे.

खड्डय़ांमुळे चाळणी झालेल्या जळगाव रोड ते मध्यवर्ती जकात नाका या दीड किलोमीटरच्या रस्त्यावर गेल्या महिनाभरापासून रोज सात ते आठ अपघात होत असून दुचाकीस्वारांसाठी हा रस्ता सर्वात धोकादायक बनला आहे. कुणाचा जीव गेल्याशिवाय मनपा रस्ते दुरुस्त करणार नाही का, असा सवाल या मार्गावरून दररोज जाणारे नागरिक करीत आहेत. ‘रस्त्यांची दहशत’ या मालिकेत मंगळवारी या रस्त्याबाबत वृत्त प्रकाशित होताच अनेक विद्यार्थी, नागरिकांनी आपणहून या रस्त्यामुळे होत असलेल्या त्रास कथन केला. कुणाचा जीव गेल्याशिवाय मनपा जागी होणार नाही का, असा प्रश्न सुदर्शन पाटील या विद्यार्थ्याने विचारला.

हा रस्ता तीन नगरसेवकांच्या हद्दीत येतो, पण यापैकी एकानेही या रस्त्यासाठी आंदोलन छेडले नाही. त्यातील दोन नगरसेवक सत्ताधारी शिवसेनेचे असल्याने त्यांची अडचण होते. निवेदने देण्याशिवाय त्यांनी दुसरे काही केले नाही.

अबब! काय भयंकर रस्ते !
रस्त्याबाबत ओरड सुरू झाल्यानंतर मनपाचे विरोधी पक्षनेते डॉ. जफर खान यांनी मंगळवारी शहरात फेरी मारली. ते म्हणाले, ‘अबब! काय भयंकर रस्ते आहेत. खड्डे मोजण्याच्याही पलीकडे आहेत. शहरातील सगळ्यात वाईट रस्ता जळगाव रोड ते जकात नाका आहे. पॅचवर्कसाठी दिलेल्या 15 कोटींची वाट लागली आहे. या रकमेचे नियोजन कसे झाले ते सत्ताधार्‍यांनी सांगायला हवे.’