औरंगाबाद - महिनाभरापासून गाजत असलेल्या राकाज क्लबच्या विषयावर शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत अखेर पडदा पडला. लाजतकाजत का होईना करार रद्द करून तत्काळ जागेचा ताबा घेऊन कॅव्हेट दाखल करण्याचे आदेश मनपा आयुक्त डॉ. प्रकाश महाजन यांनी दिले.
२२ जुलै रोजी घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत राकाजबद्दल कोणतीच कारवाई करण्यात आली नव्हती. त्यामुळे चौकशी करण्यासाठी थत्ते समिती स्थापन करून तीन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश देऊन बैठक तहकूब करण्यात आली होती.
शुक्रवारी सकाळी सुरू झालेल्या सर्वसाधारण सभेची सुरुवातही याच विषयाने झाली. सर्वपक्षीय नगरसेवकांनी अहवाल वाचून दाखवण्याची विनंती केली. त्यावर समितीच्या वतीने अहवाल वाचून करारात नसलेले पूल टेबल, डान्स क्लास, मसाज पार्लर, पार्किंगच्या जागेत रेस्टॉरंट हुक्का पार्लर सुरू करून कराराचा भंग केला आहे, तसेच अतिक्रमणही केले असल्याचे स्पष्ट झाले.
सदस्यांनी गायब झालेल्या हार्डडिस्कची चौकशी का केली नाही? यात जे कोणी दोषी आहेत, त्यांच्या नावाचा उल्लेख का केला नाही? यात मनपातील झारीतले शुक्राचार्य समोर का आणले नाहीत? असे प्रश्न उपस्थित केले. तसेच राकाचा करार रद्द करा, गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली. महापौर आयुक्तांमध्ये कारवाईवरून चालढकल करण्यात आली. यावर बापू घडामोडे यांनी संताप व्यक्त करत आयुक्तांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून दिली. मात्र, महाजन यांनी असमर्थता दर्शवताच नगरसेविका आक्रमक झाल्या आणि त्यांनी आयुक्तांना घेराव घालत करार रद्द करा, अशी भूमिका घेतली.
महिलांच्या घेरावामुळे आयुक्तांची कोंडी
राकाजच्याचौकशी अहवालात कराराचा भंग केला, कारवाई करणे योग्य असा शेरा असूनही महाजन कारवाई करण्यास धजावत नव्हते. त्यामुळे सर्वपक्षीय महिला नगरसेवकांनी मोर्चा सांभाळून महापौरांच्या पुढील मोकळ्या जागेत घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे तुपे यांनी बैठक तहकूब केली. तुपे निघून गेल्यावर महाजन जात असताना महिलांनी त्यांना करार रद्द करा या मागणीसाठी घेराव घातला. नंदकुमार घोडेले यांनी मध्यस्थी करून महाजनांचा रस्ता मोकळा करून दिला.
अन् सभा तहकूब
राकाजच्याविरोधात नारेबाजीही झाली आणि एकच गोंधळ उडाला. महापौरांनी १५ मिनिटांसाठी बैठक तहकूब केली. पुन्हा नारेबाजीनेच सभा सुरू झाली. शेवटी महाजन यांनी करार रद्दची घोषणा केली. या निर्णयाचे सगळ्याच नगरसेवकांनी स्वागत केले.