आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Corruption About Tough Decisions Sunil Kendrekar

भ्रष्टाचार बाबत माझे निर्णय टफ, आयुक्तपदाच्या अतिरिक्त कारभाराची इनिंग सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मनपात लोकांचा पैसा आहे. तो कोणालाही श्रीमंत करण्यासाठी नाही. मी तो कुणाला वापरूही देणार नाही. भ्रष्टाचाराबाबत माझे निर्णय टफ असतात. मी भ्रष्टाचार करत नाही आणि करूही देत नाही. बोगस कामे चालू देणार नाही. विना निविदा, परस्पर छोटी मोठी बायपास करून केली जाणारी कामे यापुढे बंद करणार आणि मागच्या कामांचीही चौकशी करणार, असा धडाकेबाज इशारा देत सुनील केंद्रेकर यांनी आपली मनपा आयुक्तपदाच्या अतिरिक्त कारभाराची इनिंग सुरू केली.
त्यांच्या कर्तव्यकठोर स्वभावाची झलक सर्वसाधारण सभेतही पाहायला मिळाली. एरवी सभागृह डोक्यावर घेणारे नगरसेवकही शांत झाले होते तर अडचणीच्या प्रश्नांना उत्तरे देताना अधिकाऱ्यांना कापरे भरले होते.
आधी बीड नंतर सिडकोत आपल्या बेधडक फक्त नियमानुसार काम या शैलीने ओळख निर्माण झालेल्या सिडकोचे मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर यांनी आज अखेर आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला. ते सकाळी सूत्रे हाती घेऊन सर्वसाधारण सभेला उपस्थित राहातील अशी अपेक्षा होती, पण दुपारी तीन वाजेची वेळ निश्चित झाली.

संघर्षाचाअनुभव आला
दरम्यानच्याकाळात सर्वसाधारण सभा सुरू झाली. प्रकाश महाजन उपस्थित होते. महापौर त्र्यंबक तुपे यांनी अायुक्तांचे कौतुक करणारे छोटेखानी भाषण केले. त्यांच्याच काळात निवडणुका चांगल्या पार पडल्या असे ते म्हणाले. यानंतर महाजन म्हणाले, मी येथे यायला तयार नव्हतो. पण तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे चांगले लोक आहेत, निझामाशी संघर्ष करून स्वातंत्र्य मिळवणाऱ्यांचे शहर आहे. असे सांगत राजी केले.
इथल्या संघर्षशील स्वभावाचा अनुभव मला अाला. जाणते अजाणतेपणी कुणी दुखावले गेले असेल तर मी तुमची माफी मागतो. नागरिकांच्याही खूप अपेक्षा होत्या त्या सगळ्या पूर्ण करता आल्या नाहीत म्हणून त्यांचीही माफी मागतो पण वेळोवेळी जे सहकार्य केले त्याबद्दल मी त्यांचा आभारीही आहे. यानंतर सभा काही काळ तहकूब करण्यात आली.

तेआले आणि लागले कामाला : बरोबरतीन वाजता केंद्रेकर मनपात दाखल झाले. आयुक्तांच्या दालनात त्यांच्या औपचारिक स्वागतासाठी बसलेल्या महाजन यांनी पुष्पगुच्छ मागवताच त्यांनी मी पुष्पगुच्छ स्वीकारत नाही असे सांगत त्यांनी लगेच पदभार स्वीकारण्याच्या कागदपत्रांवर सह्या केल्या. छायाचित्रकारांनाही त्यांनी दालनाबाहेरच ठेवले. सह्या करून ते सभागृहात आले. महापौर इतर पदाधिकाऱ्यांनी प्रथा आहे, असे म्हटल्यावर त्यांच्याकडून त्यांनी पुष्पगुच्छ स्वीकारला. यानंतर सभेचे कामकाज सुरू झाले. नगरसेवक कसे बोलतात, अधिकारी कसे उत्तर देतात हे ते बारकाईने पाहत होते. एवढेच नव्हे तर विषय काय सुरू आहे, याची माहिती ते घेत होते.

अधिकाऱ्यांनाअनुभव आला : बहुतेकनगरसेवकांनी दोन दोन महिने माहिती, समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याचे सांगितले. प्राणीसंग्रहालयाचे संचालक नाईकवाडे त्यांच्या कॅनडा दौऱ्याचा सविस्तर बोलत असताना त्यांना केंद्रेकरांनी थांबवले. नाईकवाडे यांच्याच सेवा विलीनीकरणाबाबत माहिती देताना विधी सल्लागार ओ. सी. शिरसाट यांनी माझ्यासमोर फाइल आली नसल्याचे सांगताच पण कायदा तर माहीत असेल ना. तो सांगा, असे ठणकावले.

अँटीकरप्शनकडे जाच : घरकुलयाेजनेत लाभार्थीना लुबाडले जाते, पैसे मागितले जातात. मग लोक नाइलाजाने अँटी करप्शनकडे जातात असे नगरसेवक राजू शिंदे म्हणताच केंद्रेकर यांनी नाईलाजाने कशाला म्हणता, असे उद्योग कुणी करत असेल तर अँटी करप्शनकडे जाच असे स्पष्ट केले. केंद्रेकर यांच्या या शैलीमुळे उत्तर द्यायला आलेल्या अधिकाऱ्यांची चांगलीच धांदल उडत होती.

आणखीकाय म्हणाले केंद्रेकर: सिडकोच्याकामासाठी आठवड्यातून दोनदा मी मुंबईला जात असतो. पण आता एकदाच जाईन. रस्ते, पाणी, आरोग्य कचरा याच चार महत्त्वाच्या अपेक्षा लोकांना असतात. त्या आपण तीन महिन्यांत सोडवू. रात्री उशिरापर्यंत काम करणे अपेक्षित नाही. १० ते याच वेळेत टिच्चून काम केले तरी अनेक प्रश्न सुटू शकतात. अधिकारी पदाधिकाऱ्यांतील विसंवाद कमी करण्यासाठी मला प्रत्यक्ष भेटा. वाळूज आणि नवी मुंबईतील सिडकोत कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी उपाय इथेही वापरणार आहोत. त्यासाठी सगळ्या नगसेवकांनीही प्रयत्न करायला हवेत. त्यात नागरिकांनाही ओढावे लागेल.
केंद्रेकरांची प्रतीक्षा सुरक्षा अिधकारीही करत होते.
नवे प्रभारी आयुक्त केंद्रेकर यांचे मनपा पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.

आज सभा
शुक्रवारी (२० नोव्हेंबर) या महिन्याची नियमित सर्वसाधारण सभा होत आहे. या सभेत विकास आराखडा सादर केला जाण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यातच तो आयुक्तांकडे सोपवण्यात आला आहे.

एफआयआर नोंदवा
सिडकोतीलअवैध बांधकामाची तक्रार सीमा खरात यांनी केली. त्यावर मालमत्ता विभागाचे वसंत निकम, उपायुक्त रवींद्र निकम यांना तत्काळ त्या जागेची पाहणी करा, कागदपत्रे तपासा आणि एफआयआर नोंदवा असे आदेश त्यांनी दिले.

वनची कामे टार्गेटवर
सभेच्याअखेरीस केंद्रेकरांनी छोटेखानी भाषणात आपण काय करणार आहोत हे सांगताना अधिकाऱ्यांना थेट नगरसेवकांना अप्रत्यक्षपणे इशारे दिले. ते म्हणाले, मनपाच्या तिजोरीतून केवळ लोकोपयोगी विकासाचीच कामे होतील. फक्त मी आहे तोपर्यंत चांगली कामे होतील असे मुळीच नाही. या सिस्टिममधून कायमस्वरूपी चांगली कामे करण्याची व्यवस्था करू. बोगस कामे मला चालणार नाहीत, हे अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावे!