आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अध्यक्ष धारेवर, सिंचन विभागात भ्रष्टाचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सिंचन विभागाकडून अर्थ विभागाची परवानगी घेता थेट कामे मंजूर केल्याने कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप सेनेचे गटनेते मनाजी मिसाळ संतोष माने यांनी केला.
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभेची बैठक बुधवारी अध्यक्ष श्रीराम महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. समाजकल्याण विभागाचा विषय मार्गी लावल्यानंतर सदस्यांनी सिंचन विभागाच्या विषयावर चर्चेला सुरुवात करून प्रशासनासह महाजन यांना धारेवर धरले. नंदा ठोंबरे यांनी सिंचन विभागाची माहिती विचारून आठ महिने झाले तरीही त्यांना एका वर्षाची माहिती मिळाली नाही. अधिकारी - कर्मचाऱ्यांकडून सदस्यांचा अपमान केला जातो, असे माने यांनी सांगून थेट अधिकारी आणि जि. प. अध्यक्ष महाजनच भ्रष्टाचारी असल्याचा आरोप केला.
मान्यता घेता कामे : कामांना अर्थ विभागाची मान्यता घेणे अपेक्षित असताना अनेक कामे परस्पर मंजुरी देऊन करण्यात आली. आता सिंचन विभागाला किती लोकांचे देणे आहे, किती कामे झाली, किती प्रगतिपथावर आहेत, याची माहिती विचारली असता कुणालाच उत्तर देता आले नाही. महाजन यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, सदस्यांनी त्यांच्यावर शाब्दिक हल्ला केला. माहिती दिल्याशिवाय उठणार नसल्याचे म्हणत डॉ. सुनील शिंदे यांनी सभागृहातच ठिय्या मांडला. मुख्य लेखा वित्त अधिकारी उत्तम चव्हाण यांनी सगळी माहिती जमा करण्याचे काम सुरू असून ३० जूनपर्यंत माहिती देणार असल्याचे स्पष्ट केले. माहिती आल्याशिवाय बैठक पूर्ण होणार नसल्याचे म्हणत सदस्यांनी बैठक तहकूब करण्याची मागणी लावून धरली. त्यामुळे शेवटी बैठक तहकूब करावी लागली.
महाजन यांच्यावर आरोप : जलयुक्तशिवार अभियानातून महाजन यांनी केवळ सिल्लोड सोयगावातच जास्त कामे घेतल्याचा आरोप गटनेते मनाजी मिसाळ शिंदे यांनी केला. जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर, पैठण या तालुक्यांत अधिक दुष्काळ असताना महाजन यांना त्यांचाच तालुका दिसतो, असा आरोप सदस्यांनी केला. त्यावर सदस्य एक कोटीची कामे सर्कलमध्ये घेतात, मग मी अध्यक्ष आहे, मला ५० लाख रुपयांची कामे घेण्याचा अधिकार नाही का, असे म्हणत महाजन यांनी माघार घेतली.
बैठकीपूर्वी फील्डिंग
बैठकीपूर्वी समाजकल्याण सभापती शीला चव्हाण यांच्या दालनात सर्वपक्षीय महिलांची बैठक झाली. यात सगळ्यांनीच एकमत करून बैठकीपूर्वी समाजकल्याण अधिकाऱ्यांचा लाभार्थींचा विषय मांडून निर्णय घेण्याचा संकल्प केला. तसे झाल्यास बैठकच होऊ द्यायची नाही, असेही ठरले होते. त्यानुसार बैठकीत ही फील्डिंग यशस्वी झाली.
सोनकवडे सक्तीच्या रजेवर
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकारी जयश्री सोनकवडे यांच्या नाकर्तेपणामुळे २०१३ पासून वैयक्तिक लाभाच्या योजना मार्गी लागलेल्या नाहीत. त्यामुळे सोनकवडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे, अशी मागणी नंदा काळे, सुरेखा जाधव, मनाजी मिसाळ, अनिल चोरडिया यांनी लावून धरली. त्यामुळे महाजन यांनी सीईअोंना सोनकवडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश दिले.
घरचा आहेर
महाजन यांना सदस्यांनी सिंचनाच्या कामावरून कोंडीत पकडले होते. आपण सिंचन विभागाचे प्रमुख आहात. यातच सर्वाधिक भ्रष्टाचार झाला, असा आरोप शिवसेनेच्या सदस्यांनी केला. काँग्रेसचे शिक्षण सभापती विनोद तांबे यांनीही शिवसेनेची री ओढली. इतर विभागांची कामेही महाजन यांच्यामुळे होत नसल्याचा आरोप काँग्रेस, राष्ट्रवादी मनसे सदस्यांनी करून अध्यक्षांना घरचा आहेर दिला.
बातम्या आणखी आहेत...