आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीच्याच आमदारामुळे विद्यापीठाला गालबोट !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विद्यापीठात जातीयवादी शक्तींचा वापर करून सर्व अधिकार मंडळांवर राष्ट्रवादीच्या आमदाराने बगलबच्चे निवडून आणले. त्यांच्या मदतीने विद्यापीठात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप स्वाभिमानी मुप्टा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. आमदार सतीश चव्हाण यांनी कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्यावर केलेल्या आरोपाचे खंडन करण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे.

विद्यापीठात नियमबाह्य कामे करून घेऊन प्रचंड पैसा उकळण्याचा धंदा सर्रास चालू आहे. तो रोखण्यासाठी नवनियुक्त कुलगुरू डॉ. चोपडे हे प्रयत्न करीत आहेत. म्हणूनच त्यांच्याविरोधात पत्रकार परिषद घेऊन दबाव टाकण्याचा प्रयत्न पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण करत असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला.
चव्हाण हे पदवीधरांचे आमदार आहेत की विद्यापीठाचे? असा प्रश्न उपस्थित करीत विद्यापीठाच्या कारभाराला राष्ट्रवादीच्याच आमदारांनी गालबोट लावले असल्याचेही या वेळी स्वाभिमानी मुप्टा संघटनेचे अध्यक्ष डॉ. शंकर अंभोरे आणि माजी मंत्री गंगाधर गाडे यांनी
सांगितले. या वेळी डॉ. किशोर साळवे, प्रा. किशोर वाघ, के. व्ही. मोरे, अनिल उबाळे आदींची उपस्थिती होती.

राज्यभर आंदोलन करू

लवकरच विद्यापीठात निवडणुका होणार आहेत. त्यामुळेच आमदार अशी गरळ ओकत असल्याचेही डॉ. अंभोरे यांनी म्हटले आहे. कुलगुरूंनी कारवाई करू नये म्हणूनच हे दबावतंत्र वापरले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. विद्यापीठाची बदनामी आमदार करत असून त्यांनी आपले नियमबाह्य कृत्य थांबवले नाही तर राज्यभर आंदोलने पेटतील. शिक्षणमंत्र्यांनाही त्यांच्या गैरव्यवहाराची माहिती देण्यात येईल, असेही डॉ. अंभोरे यांनी म्हटले आहे.