आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम घ्यायचाय तर दारू, पैसे द्या! वेरूळ लेणी परिसरात सुरक्षा रक्षकांची जवानांकडे मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - समाजात बंधुभावाचा संदेश देणे आणि मराठी तरुणांना सैन्यात भरती होण्याचे आवाहन करण्यासाठी सैन्यदलाच्या सायकल मोहिमेचा रविवारी कैलास लेणीसमोरील रस्त्यावरून शुभारंभ झाला. सर्व परवानगी घेतली असतानाही ऐनवेळी लेणी परिसरातील नियुक्त खासगी सुरक्षा रक्षकांनी कार्यक्रम घेण्यासाठी जवानांकडे आर्मीची दारू आणि पैशाची मागणी केली. जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या वेरूळ लेणी भागात जवानांनाच लाच मागितली जात असेल तर देशी-विदेशी पर्यटकांचा किती छळ केला जात असेल, असा प्रश्न अधिकाऱ्यांनी उपस्थित केला.

सैन्यदलाच्या ४१ आर्टिलरी डिव्हिजनच्या वतीने वेरूळ ते गेटवे ऑफ इंडिया सायकल अभियान घेतले जात आहे. सैन्यदलाचे एक अधिकारी १६ जवानांसह सायकलवरून मुंबईकडे रवाना झाले. अभियानास हिरवी झेंडी दाखवण्याच्या कार्यक्रम कैलास लेणीसमोरील मोकळ्या जागेत घेतला जाणार होता, पण परवानगी मिळाली नसल्याने परिसरातील छोट्या रस्त्यावर सैन्याला कार्यक्रम घ्यावा लागला. कार्यक्रमात वेरूळ येथील खासगी शाळेतील विद्यार्थ्यांसह सैन्याच्या अग्निबाज पूर्व प्राथमिक शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले.सैन्याचा मोठा लवाजमा व गाड्यांची वर्दळ परिसरात होती. सैन्याच्या २२ मेडियम रेजिमेंटकडे कार्यक्रमाचे नियाेजन देण्यात आले होते. कार्यक्रमासाठी छोटेखानी व्यासपीठाची उभारणी करणे, कार्यक्रमानंतर रस्त्याच्या कडेला चहापानासाठी कनात लावणे आदी कामे करण्यात आली होती.

सुरक्षा रक्षकांची जवानांशी हुज्जत
सैन्याच्या गाड्या मुख्य प्रवेशद्वारावर येण्यास सुरुवात झाली. तेथील चौकीदारांनी गाड्या अडवून वाद घातला. पुरातत्त्व विभागाकडून परवानगी घेतल्याचे सांगितल्यावरही जवानांशी हुज्जत घातली. काही अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली, पण लेणी परिसरात कार्यक्रमास परवानगी नसल्याचे स्पष्ट केले. दारू व पैसे द्या, अशी मागणी झाल्यावर अधिकाऱ्यांनी आवाज चढवताच सुरक्षा रक्षकांची गाळण उडाली.

पर्यटन कसे वाढणार
युनोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत समावेश असलेल्या वेरूळ लेणी परिसरात एजंट, दलाल व चिरीमिरी करणाऱ्यांचा सुळसुळाट वाढत राहिला तर येथे पर्यटक कसा येणार? अशा वागणुकीमुळे वाईट भावना निर्माण होऊन कुणीही पर्यटनासाठी वेरूळचे नाव सुचवणार नाही.
राजेश सहा, लेफ्टनंट कर्नल