आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Cotton Seeds And Fertilizer Price Issue In Aurangabad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्ह्यात कपाशी बियाण्यांची अडीचपट अधिक दराने विक्री

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद: खरीप हंगामाकरिता बी-बियाणे व खते खरेदीसाठी शेतकरी बाजारपेठेत येत आहेत. मात्र, बियाणे व खते कंपन्यांकडून बियाणे नियमाप्रमाणे उपलब्ध करून दिली नसल्याने व्यापार्‍यांकडून बियाणे आणि खताची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. कपाशी बियाण्यांची 900 रुपयांची बॅग दोन ते अडीच हजार रुपयांना विक्री केली जात असल्याची माहिती शेतकर्‍यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.
खरिपाची पेरणी काही दिवसांतच केली जाणार आहे. त्यासाठी शेतकर्‍यांनी शेत मशागतीची 80 टक्के तयारी पूर्ण केली आहे. वेळेवर फजिती होऊ नये, म्हणून कपाशी बियाणे व खते खरेदीसाठी शेतकरी बाजारपेठेत गर्दी करीत आहेत. मात्र, व्यापारी बियाणे आणि खताची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. महिको 7351 व अजित 155 कपाशी बियाण्यांची किंमत 900 रुपये असताना दोन ते अडीच हजार रुपयांप्रमाणे विक्री होत आहे. यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक शोषण होत आहे. वेळेवर व योग्य किमतीत खते, बियाणे देण्याचे आश्वासन मंत्री, अधिकार्‍यांनी खरीप आढावा बैठकीत दिले होते. खते व बियाण्यांचा काळाबाजार करणार्‍यांविरोधात फौजदारी गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत; पण अद्याप कोणावरही कारवाई करण्यात आलेली नाही. बियाणे व खत कंपन्यांकडूनच आवश्यक पुरवठा होत नसल्याने शेतकर्‍यांची परवड होत आहे.
मंत्री, अधिकारी फक्त आश्वासने देतात
-मशागतीची तयारी जवळपास 80 टक्के पूर्ण झाली आहे. बियाणे व खत खरेदीसाठी आज मी आलो होतो. मात्र, महिको 7351 व अजित 155 कपाशी बियाणे उपलब्ध नसल्याचे व्यापारी सांगत आहेत. हेच बियाणे काळ्या बाजारात दोन ते अडीच हजार रुपये किमतीप्रमाणे विक्री होत आहे. मंत्री व अधिकारी आढावा बैठकीत काळाबाजार करणार्‍यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची भाषा करतात. मात्र, बियाणे पुरवठा कंपन्या नियमाप्रमाणे बियाण्यांचा पुरवठा करतात का? याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. काकासाहेब आंभोरे, शेतकरी, महाल पिंपरी
अधिक पैसे घेणार्‍यांची माहिती द्या, अध्र्या तासात कारवाई करू
-बाजारात सध्या काही बियाण्यांची टंचाई आहे हे खरे आहे, परंतु व्यापारी शेतकर्‍यांकडून जर अधिक पैसे घेत असतील तर शेतकर्‍यांनी संबंधित कृषी अधिकार्‍यांशी संपर्क करावा. त्यानंतर लगेच अध्र्या तासात संबंधितांवर कारवाई केली जाईल. शेतकर्‍यांनी एकाच वाणाची मागणी करू नये. डी. आय. गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी