आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कापूस पळवण्याच्या घटनांमुळे शेतक-यांची चिंता वाढली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज-अत्यल्प पावसामुळे अडचणीत सापडलेल्या शेतक-यांच्या काळजीत चोरट्यांनीही भर टाकली आहे. वाळूज भागातील शेतीतील वेचणीला आलेला कापूस लंपास केला जात असल्याने कापूस उत्पादक शेतक-यांत चिंता पसरली आहे. गेल्या तीन वर्षांपासून वाळूज भागात दरवर्षी अत्यल्प पाऊस होत आहे. त्यामुळे कधी नव्हे, एवढ्या भीषण दुष्काळाच्या झळा या परिसराने अनुभवल्या आहेत. त्यातून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर उभा राहिला. यंदाही तीच परिस्थिती उद्भवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
दीड महिना उशिरा पाऊस पडल्यानंतर रिमझिम पावसावर शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या कापसाचे पीकही बऱ्यापैकी आले. त्यामुळे शेतकरी वर्गाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, कै-या लागल्यानंतर पावसाने दडी मारली, ती आतापर्यंत. त्यामुळे कपाशीची पिके पावसाअभावी होरपळू लागली आहेत. तशातच पाणी उपलब्ध असलेल्या शेतक-यांनी पाणी दिले. त्यामुळे कापूस वेचणीला आला, परंतु मजुरांअभावी वेचणीचे काम रखडल्याची संधी घेत रात्रीतून चोरट्यांनी कापूस लंपास केला. हातातोंडाशी आलेला घास हिसकावला जात असल्यामुळे शेतकरीवर्ग संतप्त व काळजीत सापडला आहे. येथील नायगाव शिवारातील रामकिसन अग्रवाल यांच्या शेतीतून रविवारी रात्री सुमारे दीड क्विंटल कापूस चोरट्यांनी लंपास केला आहे, तर सुभाष गव्हाणे, राम गवंदे, भीमराव पाटील, सुनील गंगवाल, नानासाहेब आरगडे यांच्यासह इतर शेतकऱ्यांचाही कापूस पळविला जात असल्याने शेतकरीवर्गात अस्वस्थता आहे.
चोरटे पकडणे पोलिसांना सहज शक्य
कापूस चोरणारे चोटरे परिसरातील व्यापाऱ्यांकडेच कापूस विक्री करतात. व्यापाऱ्यांना तंबी देत सातबारा उताऱ्याशिवाय विक्रीला येणाऱ्या कापसाबद्दल तातडीने माहिती पोलिसांना देण्याची सूचना केल्यास चोरीला आळा बसू शकणार आहे. कारण चोरटे कापूस व्यापारी वर्गाकडेच विकण्यासाठी आणतात. त्यासाठी पोलिसांनी दक्ष राहून तपास केल्यास चोरटे सापडण्यास मदत होऊ शकेल, असे शेतकरी वर्गाचे म्हणणे आहे.