आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकनाथनगरचे नगरसेवक चार वर्षांपासून बेपत्ता ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वॉर्ड क्रमांक 90, एकनाथनगर भागातील म्हाडा कॉलनी, ओंकारेश्वर महादेव मंदिराच्या परिसरातील समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. काही दिवसांपासून अर्धा तास कमी दाबाने पाणी येत आहे. महादेव मंदिराच्या परिसरातच नाला घाणीने ओव्हरफ्लो झाला आहे. दुर्गंधी वाढल्याने आरोग्य धोक्यात आले आहे. परंतु एकनाथनगरचे नगरसेवक सिकंदर साजेद हे निवडून आल्यापासून बेपत्ता आहेत. नागरिकांचाच प्रतिनिधी दुर्लक्ष करीत असेल तर आम्ही समस्या कोणाकडे मांडणार, असा सवाल येथील नागरिक करीत आहे.
एकनाथनगरात समस्या वाढल्या असून ड्रेनेजचे ढापे मोडकळीस आले आहेत. रात्रीच्या वेळी वाहनधारकांना मोडकळीस आलेली ढाप्यावरील जाळी दिसत नसल्याने अपघात होत आहेत. पावसाळ्यात महादेव मंदिराच्या परिसरातील नाल्याचे पाणी बाहेर जाण्यासाठी आऊटलेट काढण्यात आलेले नसल्याने संपूर्ण परिसरात पाणीच पाणी असते. साफसफाई कर्मचारी या भागात फिरकत नसल्यामुळे नागरिकांनाच परिसर स्वच्छ ठेवावा लागतो. समस्यांनी वेढलेल्या एकनाथनगरवासीयांनी थेट महापौर, मनपा अधिकार्‍यांपर्यंत धाव घेतली. परंतु कुणीच समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला नसल्याने नागरिकांचे म्हणणे आहे. नगरसेवक वॉर्डात फिरकला नसल्याने समस्या वाढतच आहेत. चार वर्षांपासून नागरिक त्रस्त असून समस्या सोडवण्यात याव्यात, अशी मागणी विजया कासार, नारायण नासरे, इंदू काळे, आशा तायडे, आर .बी. भानुसे, दिलीप भावसार, पूर्णपात्रे गुरुजी आदी नागरिकांनी केली आहे.