आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखंड बैठका, चर्चा कृषिमंत्र्यांचा झपाटा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - महाराष्‍ट्रातील दुष्काळग्रस्त भागाला केंद्राकडून जास्तीत जास्त मदत कशी देता येईल यासाठी दुष्काळी भागाचा दौरा करणा-या केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांनी आपल्या औरंगाबाद मुक्कामात एक मिनिटही दवडला नाही. मध्यरात्रीपर्यंत माहिती घेणे, चर्चा सुरू होत्या, तर सकाळही बैठकांनीच सुरू झाली.

केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी रविवारी जालना जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा दौरा केला. दिवसभर दौरा, सायंकाळी जालन्यात आढावा बैठक व नंतर पत्रकार परिषद उरकून ते रात्री 9 वाजून 35 मिनिटांनी जालन्यातून औरंगाबादकडे निघाले. साडेदहाच्या सुमारास सुभेदारी विश्रामगृहात त्यांचे आगमन झाले. साडेअकरा वाजेपर्यंत त्यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे, राष्‍ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांच्यासोबत चर्चा केली. सोमवारच्या ‘शेड्यूल’वर अंतिम हात फिरवत जेवण आटोपले. साडेबाराच्या सुमारास झोपी गेलेल्या शरद पवारांचा सोमवार सकाळी साडेसहालाच सुरू झाला.

सकाळी वर्तमानपत्रांवरून नजर फिरवून झाल्यानंतर निरोप गेले. जिल्हाधिकारी विक्रम कुमार, जिल्हा परिषदेचे सीईओ सुखदेव बनकर आणि महसूलचे अधिकारी सुभेदारीवर आले. त्यांच्याशी शरद पवार यांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत चर्चा केली. सरकारी यंत्रणेने काय उपाययोजना केल्या आहेत त्याची माहिती घेतली. जायकवाडीतील पाण्याची परिस्थिती, शेतीचे नुकसान, पिण्याच्या पाण्याची परिस्थिती, टँकरची स्थिती आदी माहिती त्यांनी जाणून घेतली. काही नोंदी करून घेतल्या.

त्यानंतर बीड जिल्ह्यातील आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतली. सार्वजनिक बांधकाममंत्री जयदत्त क्षीरसागर, आमदार सुरेश धस, अमरसिंह पंडित, धनंजय मुंडे आणि पृथ्वीराज ताठे यांनी त्यांना बीड जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीची माहिती दिली. या वेळी बहुतेक आमदारांनी रोजगाराचा प्रश्न बिकट होत असल्याचे सांगून रोहयो, नरेगाच्या कामांची गरज असल्याचे सांगितले. विभागीय आयुक्तालयातील बैठकीआधी अशी सारी पूर्वतयारी केल्यानंतर त्यांनी औरंगाबादेत दाखल झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. या सकाळच्या बैठकसत्रानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात अधिका-यांची त्यांनी बैठक घेतली.

केंद्रीय ग्रामविकासमंत्र्यांची चर्चा
तालुकानिहाय माहिती घेतल्यावर शरद पवार यांनी तेथूनच केंद्रीय ग्रामविकासमंत्री जयराम रमेश यांना दूरध्वनी केला. बीड जिल्ह्यातील आणि मराठवाड्यातील दुष्काळाच्या परिस्थितीची माहिती देत या भागांत नरेगाची कामे देण्यासंदर्भात काय करता येईल यावर चर्चा केली. 15 मिनिटांच्या या चर्चेत शरद पवार यांनी रमेश यांना मराठवाड्याचा दौरा करून लवकरात लवकर निर्णय घ्या, अशी सूचना केली. त्यानंतर रमेश यांनी येत्या दोन-तीन दिवसांत आपण स्वत: दौरा करून पाहणी करू, असे सांगितले.