आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यापुढे शहरापासून चार कि.मी.वर फटाका स्टॉल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भविष्यात जिल्हा परिषद मैदानावर फटाका स्टॉल लावण्यास महानगरपालिका आता परवानगी देणार नाही. यापुढे शहरापासून किमान तीन ते चार किलोमीटवर फटाका स्टॉल लावण्याचा निर्णय शनिवारच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. सर्व पक्षांच्या सदस्यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले. दुकाने जळाली त्यांना भरपाई देण्याचा प्रस्तावही सभेने फेटाळला. जिल्हा परिषद मैदानाबरोबरच टीव्ही सेंटर, राजीव गांधी मैदान येथेही फटाका स्टॉल लावले जाणार नाहीत, हेही या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.
शनिवारी सभा सुरू होताच सभागृहनेते राजेंद्र जंजाळ यांनी हा मुद्दा उपस्थित केला. २९ ऑक्टोबरच्या आगीत जीवित हानी झाली नसली तरी हा प्रकार गंभीर आहे. मनपाने तेथे फटाका स्टॉलसाठी नाहरकत प्रमाणपत्र दिलेच कसे, असा सवाल त्यांनी केला. तर या आगीला सर्वस्वी पोलिस जबाबदार असल्याचा आरोप राज वानखेडे यांनी केला. पालिकेच्या अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करताच कार्यालयात बसूनच प्रमाणपत्र दिल्याचा आरोप राजू वैद्य यांनी केला. आगीनंतर अग्निशमन अधिकारी शिवाजी झनझन यांच्यावर करण्यात आलेली कारवाई योग्यच असल्याचे एमआयएमचे नगरसेवक ढगे म्हणाले. तर केवळ जिल्हा परिषद मैदानातच नव्हे तर टीव्ही सेंटर, राजीव गांधी मैदानासह अन्य जेथे फटाक्यांचे स्टॉल लागतात, त्याला महानगरपालिकेने परवानगी देऊ नये, अशी मागणी स्थायी समितीचे माजी सभापती दिलीप थोरात यांनी केली.

भरपाईचामुद्दा फेटाळला
दरम्यानया दुर्घटनेमुळे फटाका व्यापारी कंगाल झाले आहेत. ऐन दिवाळीत त्यांच्यावर संक्रांत आल्याने पालिकेने स्टॉलधारकाला प्रत्येकी लाख रुपये द्यावेत, अशी मागणी घोडेले यांनी केली.
एमआयएमचे अय्युब जहागीरदार यांनी यास आक्षेप घेत स्टॉलचा परवाना घेतलेल्यांचे दुकान दुसराच माणूस चालवत होता. येथे परवाना भाड्याने देण्याची परंपरा तयार झाली आहे. त्यामुळे ज्याचे फटाके जळाले, त्याला ही भरपाई मिळणार नसल्याने भरपाई देऊ नये, असे जहागीरदार यांनी सांगितले. त्यावर घोडेले वगळता सेना किंवा भाजपच्या अन्य कोणीही मागणी केली नाही. त्यामुळे महापौर त्र्यंबक तुपे यांनी नुकसानभरपाईचा कोणताही निर्णय घेतला नाही.

महापौरांचा निर्णय
यापुढे जिल्हा परिषद मैदानावर फटाका स्टॉल लावण्यासाठी महानगरपालिका नाहरकत प्रमाणपत्र देणार नाही. शहराबाहेर-निवासी वसाहतीपासून ते किलोमीटरवर हवे तर शहराच्या चारही बाजूंनी स्टॉल लावण्यात यावेत. परंतु शहरात असे स्टॉल असणार नाही, याची खबरदारी पालिका प्रशासनाने घ्यावी, असे महापौरांनी सांगितले.

असे चित्र
याचर्चेत सर्वपक्षीय सदस्यांनी सहभाग घेतला. शिवसेनेकडून सभागृहनेते राजेंद्र जंजाळ, गटनेते राजू वैद्य, नंदकुमार घोडेले ही मंडळी अग्निशमन विभागाच्या विरोधात तुटून पडली असताना भाजपकडून माजी उपमहापौर राजू शिंदे, राज वानखेडे हे झनझन यांच्या बाजूने होते. आग लागल्यानंतर झनझन वेळेत तेथे पोहाेचले. यात त्यांची काहीही चूक नाही, असा भाजपचा युक्तिवाद होता. तर निवासी वसाहत आजूबाजूला असताना फटाके लावण्यासाठी ना हरकत देणे ही चूकच असल्याचे सेनेचे म्हणणे होते. विषय आगीचा असला तरी सेना विरुद्ध भाजप असे चित्र होते.
बातम्या आणखी आहेत...