आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरवस्त्यांमध्ये धोकादायक फटाका बाजार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगपुऱ्यातील जि. प. मैदानावर झालेल्या अग्निकांडानंतर शहरातील इतर फटाका बाजाराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या आगीनंतर दिव्य मराठीने शहरातील ठिकठिकाणच्या फटाका बाजाराची पाहणी केली. यात त्रिमूर्ती चौक आणि मुकुंदवाडी भाजी मंडई येथील फटाका बाजार धोकादायक स्थितीत दिसून आले, तर ठाकरेनगर, एन-२ येथील फटाका बाजार मात्र बऱ्यापैकी सुरक्षित असल्याचे आढळले. औरंगपुऱ्यातील अग्निकांडानंतर आता तरी किमान इतर फटाका बाजारामध्ये संभाव्य घटना टाळण्यासाठी प्रशासनासह फटाका विक्रेत्यांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. दिव्य मराठीच्या पाहणीत काय आढळले, ते पुढीलप्रमाणे...
जवाहर कॉलनी
त्रिमूर्तीचौक परिसरात असलेल्या नियोजित भाजी मंडईच्या जागेवर फटाका बाजार आहे. जाण्यासाठी निमुळती जागा आहे. आतमध्ये तीन पाण्याने भरलेले ड्रम मांडलेले होते. मात्र, जागोजागी विजेच्या वायरला जॉइंट दिलेले होते. तसेच नियमानुसार दोन दुकानांमध्ये किमान चार फूट जागा असावी, येथे मात्र सर्वच दुकाने एकमेकांना अगदी खेटून होती. अग्निशामक वायूने भरलेले सिलिंडर केवळ एकाच दुकानासमोर होते. विशेष म्हणजे या बाजाराला खेटून अवघ्या ३० फुटांच्या अंतरावर महापालिकेचे आरोग्य केंद्र, उद्यान आणि घरे आहेत. जर आग लागली तर तेथून तात्काळ बाहेर पडणेही अशक्य आहे.

मुकुंदवाडीभाजी मंडई
येथील लक्ष्मीमाता मंदिरासमोरील मोकळ्या जागेत फटाक्यांचे स्टॉल्स लावलेले आहेत. घरांपासून केवळ २० फूट अंतरावर हे सर्व स्टॉल्स आहेत. दोन्ही दुकानांमध्ये मोकळी जागा नव्हती. नेहमी माणसांच्या वर्दळीने गजबजलेला हा परिसर असतानाही येथे अाग प्रतिबंधक उपाययोजना केलेल्या नाहीत. आजूबाजूच्या घरांना लागूनच हे स्टॉल्स आहेत. दुर्दैवाने आगीची घटना घडली तर विझविण्यासाठी कुठलीही उपाययोजना येथे नाही, शिवाय अग्निशमन दलाची गाडीही येथे लवकर पोचू शकत नाही. कारण समोरच फळ, भाजी विक्रेत्यांनी रस्ता काबीज केलेला आहे. सणासुदीच्या दिवसांत येथून दुचाकी बाहेर काढणे जिकिरीचे होते. यावरूनच आग लागल्यास काय स्थिती होईल, याचा अंदाज लागतो.

ठाकरेनगर,एन -
ठाकरे नगरमधील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर हे बाजार आहे. आम्ही पाहणी केलेल्या बाजारांपैकी केवळ हेच बाजार सुरक्षित वाटले. चारही बाजूंनी प्रत्येक दोन दुकानांच्या मध्ये चार फुटांची जागा सोडलेली आहे. तसेच प्रत्येकी दोन दुकानांसाठी २०० लिटर पाण्याने भरलेला एक एक ड्रम होता. कुठेही वायरला उघडे जॉइंट्स नव्हते. प्रत्येक दुकानाच्या समोर अग्निशामक वायूचे सिलिंडर्स लावलेले होते. बाहेर पडण्यासाठी प्रशस्त गेट आणि रस्ते असल्याने हे बाजार सुरक्षित वाटले.

टीव्हीसेंटर, हडको
येथील फटाका बाजारातील काही विक्रेत्यांनी तर चक्क आकडा टाकून वीज घेतली. यातून वीजचोरी तर होतेच, शिवाय मीटर नसल्याने विद्युत सुरक्षितताही धोक्यात येते.

काय आहेत अग्निशमन विभागाचे नियम
{दोनदुकानांमध्ये किमान चार फूट अंतर असावे
{फटाका बाजाराच्या परिसरात कायम अग्निशमन पथकाची गाडी असावी
{प्रत्येक दुकानामध्ये आपत्कालीन परिस्थितीमध्ये आग विझविण्यासाठी अग्निशामक वायूने भरलेले सिलिंडर्स, मातीने भरलेल्या बादल्या, पाण्याने भरलेले ड्रम्स असावेत
{इलेक्ट्रिक सप्लायच्या लाइनला मध्येच जाॅइंट असू नये
{बल्ब किंवा इतर विद्युत उपकरणांसाठी प्लग पिनचाच वापर केला पाहिजे
{स्पार्किंग, सर्किटसारखे विद्युत बिघाड झाल्यास ट्रीप होणारे विद्युत मीटर असावे
{सर्व दुकानचालकांना फायर सेफ्टीचे प्रशिक्षण आवश्यक
{पार्किंगसाठी स्वतंत्र जागा आवश्यक

बातम्या आणखी आहेत...