औरंगाबाद- सेंट झेवियर्स संस्थेचे 52 लाख रुपये लुटण्याचे प्लॅनिंग करण्यासाठी सेंट झेवियर्सच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या क्रेझी बाइट हॉटेलमध्ये गेल्या आठ दिवसांपासून कट रचला जात होता. सात जणांची टोळी सायंकाळी सहा ते आठच्या वेळात तेथे बसून प्रत्येकाने नेमके काय करायचे, हे ठरवत होती. या गँगचा सूत्रधार सत्यवान पगारे (मुकुंदवाडी) प्लॅन आखत होता. त्यानेच लुटीसाठी वापरलेल्या दुचाकींमध्ये पेट्रोल टाकण्याचीही व्यवस्था शनिवारी सकाळी केली होती. लूटमार हाच धंदा असलेल्या सत्यवानला तीन बायका आहेत. त्यांची हौसमौज पुरवण्यासाठी त्याने मोठा डल्ला मारण्याचे ठरवले होते, असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे सूत्राने ‘दिव्य मराठी’ला सांगितले. सेंट झेवियर्सचे व्यवस्थापक दीपक पुजारी यांनी धाडस दाखवून लुटारू आर्केशला पकडल्यामुळेच पोलिसांना रक्कम मिळवणे शक्य झाले, असेही त्यांनी सांगितले.
कर्मचारीच झाला फितूर
सत्यवान मोठ्या रकमेच्या शोधात असतानाच त्याची सेंट झेवियर्स संस्थेचे सर्वेसर्वा कॉलिन्स अल्बुकर्क यांचा कारचालक विजय सरोदेशी ओळख झाली. संस्थेच्या तीन शाळांत जूनमध्ये मोठी रक्कम जमा होते आणि ती बँकेत भरली जाते, याची तपशिलासह माहिती सरोदेला होती. वर्षभरापूर्वी त्याला डिझेल चोरीच्या प्रकरणात व्यवस्थापकांनी पकडले होते. मात्र, त्या वेळी फक्त समज देऊन त्याला सोडून देण्यात आले. त्यामुळे त्याची आणखीनच हिंमत वाढली. सत्यवानने त्याला लुटीचा डाव सांगताच तो तत्काळ फितूर झाला.
साथीदारांचा शोध
मात्र, या दोघांना साथीदारांची गरज होती. म्हणून त्यांनी आणखी काही जणांचा शोध सुरू केला. सत्यवानने ऑर्केस्ट्रामध्ये काम करणारा त्याचा भाऊ आर्केश, सिमेंट दुकानात काम करणारा पंडित कांबळे, त्याचा भाऊ रमेश कांबळे, विनोद साळवे, कृष्णा देवरे अशी फौजच उभी केली. 13 जून रोजी टोळी एकत्र झाली आणि त्यांनी क्रेझी बाइटमध्ये गेम सेट करण्यास सुरुवात केली. माहिती विजयची आणि प्लॅनिंग सत्यवानचे अशी विभागणी होती.
क्रेझी बाइटच का?
सेंट झेवियर्स संस्थेचे प्रमुख अल्बुकर्क यांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर असलेले क्रेझी बाइट हॉटेल या टोळीने मुद्दाम निवडले. बिअर बार, ढाब्यावर पोलिसांच्या धाडी पडतात अथवा त्यांचे खबरेही कधी-कधी तेथे असतात. त्यामुळे शांत व निवांत ठिकाण, जेथे गर्दी नसते असे ठिकाण सत्यवानने शोधण्यास सुरुवात केली. क्रेझी बाइटमध्ये मध्यमवर्गीय ग्राहकच असतात. फारशी गर्दीही नसते. त्यामुळे कुणीही आपल्याकडे संशयाने बघणार नाही, असे विजयने सांगितले. म्हणून हे सगळे जण सायंकाळी
सकाळी साडेआठपासून
सेंट झेवियर्स संस्थेचे पैसे लुटण्यासाठी आज सकाळी साडेआठ वाजेपासून सत्यवान सगळ्यांच्या संपर्कात होता. लूट करण्यासाठी त्याने दोन दुचाक्या आणि त्यामध्ये पेट्रोल टाकण्यासाठी पैसेही दिले. आर्केशसह पंडित आणि सत्यवान एकाच दुचाकीवर आले. तिघांनी कारमध्ये असलेला चालक सरोदे आणि त्याच्याशेजारी बसलेले व्यवस्थापक दीपक पुजारी यांना शिवीगाळ, मारहाण केली. याचदरम्यान, करिझ्मावर आलेल्या विनोद साळवे आणि रमेश कांबळेने रक्कम असलेली बॅग पळवली.
असे झाले फरार
पैशांची लूट झाल्यानंतर आर्केश जागेवरच पकडला गेला. मात्र विनोद आणि रमेश हे दोघे बॅग घेऊन चांदखेड्याला गेले. तेथे रमेशच्या शेतातील कच-याच्या ढिगा-यात पैशांची बॅग ठेवल्यानंतर विनोद काळीपिवळी जीपने औरंगाबादला आला. लूट झाल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अजयकुमार पांडे, सुभाष खंडागळे यांचे पथक पाठलाग करत होते. पाठलाग सुरू असतानाच हे दोघे कचनेर फाट्यावरून पसार झाले. विनोद औरंगाबादला परतल्याची माहिती मिळाल्यानंतर या पथकाने त्याला पकडले.
आर्केशच्या मोबाइलमध्ये रेकॉर्डिंग
पोलिसांनी खाक्या दाखवताच आर्केशने तोंड उघडले. मात्र, सबळ पुराव्यासाठी पोलिसांनी त्याचा मोबाइल हस्तगत केला. त्यामध्ये पोलिसांना रेकॉर्डिंगचे सॉफ्टवेअर आढळले. आर्केश आणि त्याच्या साथीदारांमध्ये झालेले संभाषण पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांचा गेम प्लॅन आणि त्याचे साथीदार तत्काळ लक्षात आले.