आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime Booked Against Hire To Giving Arrogance Speech On Bhujbal Son And Father

भुजबळ पिता-पुत्रांविरुद्ध केलेल्या प्रक्षोभक भाषणप्रकरणी हिरेंवर गुन्हा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनमाड - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अद्वय हिरे यांनी बुधवारी सायंकाळी येथील एकात्मता चौकातील जाहीर सभेत पालकमंत्री छगन भुजबळ व आमदार पंकज भुजबळ यांच्याविरुद्ध प्रक्षोभक टीका केली. त्यामुळे त्यांच्यातील वाद आता मुद्यावरून गुद्यावर आल्याचे चित्र दिसले. संतप्त भुजबळ सर्मथकांनी हिरे यांच्या गाडीसमोर आंदोलन केल्याने वातावरण तणावग्रस्त बनले होते. पोलिसांनी बळाचा वापर करत शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी हिरे यांच्याविरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, कार्यक्रमाचे आयोजक अँड. सुभाष डमरे व माजी नगरसेवक नंदू माळी यांना अटक करण्यात आली आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून अद्वय हिरे यांनी मालेगावहून शुध्द पाण्याचे टँकर आणून मनमाडला पाणी वाटपाचा कार्यक्रम बुधवारी आयोजित केला होता. या सभेत हिरे यांनी भुजबळ पिता-पुत्रांवर व्यक्तिगत पातळीवर टीका केली. या वेळी मनमाडसाठी पाण्याच्या टँकरचे उद्घाटनही झाले. दरम्यान, हिरे यांच्या प्रक्षोभक भाषणाविरुध्द तक्रार दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पालिकेतील गटनेते बबलूभाई कुरेशी, नगरसेवक धनंजय कमोदकर आदींनी पोलिस ठाण्यात ठाण मांडले होते.

भुजबळांना आव्हान : माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर खुपसून भुजबळांनी जिल्ह्यात गुंडगिरी, पैशांच्या जोरावर सत्ता हस्तगत केली. मी यापुढे त्यांच्या छातीत खंजीर खुपसून सत्ता घेऊन दाखविन. भुजबळांनी माझ्याविरुध्द कोठेही निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हानही हिरे यांनी दिले.

स्वतंत्र ताकद उभारणार : येवला, नांदगाव व मनमाडचे कोणतेही प्रश्न भुजबळांनी सोडविले नाहीत. पाणी, वीज, शिक्षण, रोजगार नसल्याने या भागातील जनता त्रस्त आहे, अशी परिस्थिती असताना हे पिता-पुत्र मुंबईत एसीमध्ये बसून मजा मारत आहेत.

या मतदारसंघात त्यांची गाडी घुसतेच कशी, असा सवालही हिरे यांनी केला. स्वत:ची स्वतंत्र ताकद उभी करत भुजबळांविरुध्द लढा उभारण्याचा निर्णय घेतला असून, सर्वसामान्यांनी आपल्याला मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले.