आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला पर्यवेक्षिकेच्या पर्समध्ये इंग्रजीचे गाइड! दहवीच्या परीक्षेत १५ मोबाइल जप्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- राज्य उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेत कॉपीसत्र सुरूच असून अनेक नवनवीन गोष्टींची भर पडत आहे. शनिवारी झालेल्या इंग्रजीच्या पेपरमध्ये एकूण १९ कॉपी केसेस झाल्या, तर पर्यवेक्षक महिलेच्याच पर्समध्ये इंग्रजीचे गाइड सापडल्याचे बोर्डाच्या सूत्रांनी सांगितले. तथापि, या महिला पर्यवेक्षिकेचे नाव सांगण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला. दरम्यान, आजपर्यंत परीक्षेदरम्यान केलेल्या कारवाईत विद्यार्थ्यांकडून कॉपीसह १५ मोबाइल हस्तगत करण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर माजी उच्च शिक्षणमंत्र्यांच्या गावातील शाळेतही कॉपी प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

परीक्षेच्या काळामध्ये गैरप्रकार होऊ नयेत म्हणून शिक्षण मंडळाच्या सूचनेनुसार कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येत आहे. परीक्षेपूर्वी जवळपास जिल्ह्यातील सर्वच शाळांमध्ये जनजागृती, फेरी, कॉपी करण्याची शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आली. परीक्षेपूर्वी जनजागृती अन् प्रत्यक्षात मात्र खुलेआम कॉपी असा प्रकार काही केंद्रांवर दिसून येत आहे.

अनेक केंद्रांमध्ये परीक्षेचे निकष भंग करून पहिल्या दिवसापासून सामूहिक कॉपी सुरू आहे. पर्यवेक्षकांच्या माध्यमातून शांततेत परीक्षा पार पडावी, गैरप्रकार होऊ नयेत, अशी अपेक्षा असताना एका पर्यवेक्षिकेच्याच पर्समध्ये इंग्रजीचे गाइड सापडल्याचे सूत्रांनी सांगितले.

राजकीय बळ
कॉपीचे प्रकार ग्रामीण भागातील राजकीय नेत्यांच्या काही संस्थांमध्ये सर्रास होत आहेत. बोर्ड अशा शाळांवर थेट कारवाई करू शकत नाही. त्यामुळे या सर्व प्रकाराची माहिती राज्य शिक्षण मंडळास पाठवण्यात येणार आहे.

एकाच्या नावावर दुसरा!
बदनापूर येथील केंद्रावर एका विद्यार्थ्याच्या नावावर दुसराच विद्यार्थी परीक्षा देत असल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला. संबंधित दोषीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे बोर्डातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

दहा दिवसांत सुनावणी
घनसावंगी आणि पैठण येथेही मोठ्या प्रमाणात कॉपीबहाद्दरांवर कारवाई करण्यात आली आहे. या सर्व कॉपी प्रकरणांची सुनावणी आठ-दहा दिवसांत सुरू होणार आहे.

चौकशीपर्यंत मोबाइल जप्त
परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांकडून जप्त करण्यात आलेले १५ मोबाइल गैरप्रकारांची संपूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत परत दिले जाणार नाहीत, अशी माहिती बोर्ड अधिकाऱ्यांनी दिली.

औरंगाबाद | अर्जतर भरले गेले, विद्यार्थी कागदावरही दिसले; परंतु प्रत्यक्ष परीक्षेला ते बसले नाहीत. तब्बल ३८ शाळांनी विद्यार्थी कागदावरच दाखवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. बोर्ड अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता त्या शाळांमध्ये दहावीचे वर्ग आहेत; परंतु विद्यार्थीच नाहीत. हा प्रकार गंभीर असून शाळांबरोबर विद्यार्थीदेखील दिशाभूल करत आहेत, असे बोर्ड अधिकाऱ्यांनी सांगितले. बोर्ड संलग्नतेसाठी असे प्रकार केले जात असल्याचे समोर आले आहे. मुळात ज्या शाळांमध्ये विद्यार्थी नाहीत, अशा दहावीच्या तुकड्यांना शिक्षण विभागाने संचमान्यता दिलीच कशी, असा प्रश्न या सर्व प्रकारामुळे निर्माण झाला आहे. शाळांना परवानगी देण्याची जबाबदारी ही माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि शिक्षण उपसंचालक कार्यालयाची आहे. त्यांनी या सर्व बाजू पडताळून पाहणे अपेक्षित होते.