आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावठी कट्ट्याचा धाक दाखवून व्यापाऱ्याची तीन लाखांची लूट; अवघ्या दोन तासांत आरोपी जेरबंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद- तालुक्यातील वेरूळ- कसाबखेडा मार्गावर गुरुवारी रात्री गुजरात येथील व्यापाऱ्याला नागमणी देण्याचे आमिष दाखवून बोलावून घेत गावठी कट्ट्याचा धाक दाखवून तीन लाख रुपये लुटल्याची घटना घडली. याप्रकरणी खुलताबाद पोलिसांनी आरोपींना दोन तासांत जेरबंद केले. आरोपी हे पडेगाव येथील प्रियदर्शनी कॉलनी येथील रहिवासी आहेत.   

विभागीय पोलिस उपअधीक्षक नीरज राजगुरू, खुलताबादचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, पडेगाव येथील आरोपी चंचल रामटेके (वय ६०), रश्मी रामटेके (२६) व नदीमखाँ नूरखाँ (३२) या तिन्ही आरोपींनी गुजरातच्या नवसारी येथील एका व्यापाऱ्याला नागमणी तीन लाख रुपयांत देण्याचे आमिष दाखवले. त्याप्रमाणे फिर्यादी नरेंद्र यादव हे नवसारीहून ठरल्याप्रमाणे वेरूळ येथे आले. सकाळी हॉटेल वृंदावनसमोरील पार्किंगमध्ये नागमण्याविषयी बैठक झाली. नागमणी गुरुवारी रात्री देण्याचे ठरले.

गुरुवारी रात्री कसाबखेडा येथील गुरू ढाब्यावर नागमणी देण्यासाठी आरोपी जीपने (एमएच १६ व्ही ५) फिर्यादीसह आले. गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. तेव्हा ठरल्याप्रमाणे आता नागमणी देण्याची मागणी व्यापारी नरेंद्र यादव यांनी केली. परंतु आरोपींनी तीन लाख रुपये द्या, असे सांगितले. तेव्हा यादव यांना संशय आला की, आरोपींकडे नागमणी नाही. तेव्हा व्यापारी यादव यांनी गाडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपी व फिर्यादीमध्ये झाटापट झाली. तेव्हा आरोपीने जवळील गावठी कट्टा व्यापाऱ्याच्या कानावर लावला. त्याच्याकडून तीन लाख रुपयांची पैशांची पिशवी हिसकावली. झटापटीत गाडी झाडाला धडकली. तेव्हा व्यापाऱ्याने आरोपींना हिसका देत गाडीची किल्ली घेऊन तेथून पळ काढला. 

किल्ली नसल्याने आरोपींना गाडी तेथेच सोडावी लागली. तेव्हा आरोपींनी एका दुसऱ्या वाहनाने थेट छावणी पोलिस ठाणे गाठून गाडीचा अपघात झाल्याची चुकीची माहिती दिली. पोलिसांनी आरोपींना उपचारासाठी घाटीत पाठवले. दरम्यान, व्यापारी नरेंद्र यादव यांनी नेटवरून जवळचे ठाणे खुलताबाद पोलिस ठाण्याचा नंबर घेत पोलिसांना लुटीची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग यांनी गस्तीवर असलेल्या व्हॅनला घटनास्थळी पाठवले व स्वत: घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा तेथे जीप झाडाला धडकलेली आढळून आली. त्यात एक गावठी कट्टा व इतर धार्मिक विधीचे साहित्य, बांगड्या, माती, दोन मोबाइल आढळून आले. अपघातानंतर आरोपी छावणी ठाणे गाठून उपचारासाठी घाटीत गेले होते. 

आरोपी महिला काँग्रेसची माजी पदाधिकारी  
खुलताबाद पोलिसांनी पकडलेल्या दरोडेखोरांपैकी चंचल रामटेके ही दरोडेखोर महिला काँग्रेसची माजी पदाधिकारी असल्याचे समोर आले आहे. पकडलेल्या तिन्ही आरोपींची चौकशी सुरू असून खुलताबाद पोलिस अधिक तपास करत आहेत. या दरोडेखोरांकडून आणखी काही दरोडे उघड होण्याची शक्यता आहे.

पोलिस निरीक्षकासह कर्मचाऱ्यांचा सत्कार   
वेरूळ- कसाबखेडा रस्त्यावर व्यापाऱ्याला लुटणाऱ्या दरोडेखोरांना पकडणाऱ्या पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, पोलिस उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत, एसएसआय सखाराम सोनवणे, पोहेकॉ नंदकुमार नरोटे, प्रकाश मोहिते, एफ. बी. बोरकर, संजय जगताप, प्रल्हाद तांबे, शेख नदीम, गणेश लिपणे, श्रीकांत चेळेकर, रवी साबळे, भावसिंग जारवाल, प्रशांत गिते, युवराज हिवाळ आदींचा उपसभापती गणेश आधाने, नगरसेवक परसराम बारगळ, योगेश बारगळ यांनी सत्कार केला.  
बातम्या आणखी आहेत...