आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद : गांधीनगरात 2 गटांत तुंबळ हाणामारी, तिघांना भोसकले; 5 जणांना अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपींना सोमवारी सकाळी न्यायालयात हजर करण्यात आले. (छाया : मनोज पराती) - Divya Marathi
आरोपींना सोमवारी सकाळी न्यायालयात हजर करण्यात आले. (छाया : मनोज पराती)
औरंगाबाद - जुन्या वादातून रविवारी खोकडपुऱ्यातील गांधीनगरमध्ये दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. चाकू हल्ल्यात तीन जणांना भोसकण्यात आले. त्यात दोन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गणेश बलराम चावरिया (३८), संदीप मदन कागडा (३२), नितीन मदन कागडा (२७) अशी जखमींची नावे आहेत. पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून पाच जणांना अटक केली. त्यांना न्यायालयाने २४ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 
 
गांधीनगरातील कागडा आणि चावरिया कुटुंबात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. रविवारी (१६ जुलै) रात्री साडे अकराच्या सुमारास संदीप कागडा हा गांधीनगर भागातील हनुमान मंदिरासमोरील पायऱ्यांवर बसला होता. तेव्हा परिसरातील राहुल ऊर्फ डुड्डा राममहेर कागडा तेथे आला. त्याने संदीपला शिवीगाळ सुरू केली. शिवीगाळ का करतो, अशी विचारणा करताच संदीप आणि राहुलमध्ये जोरदार भांडण सुरू झाले. त्याचवेळी राहुलचे वडील राममहेर कागडा तलवार घेऊन आले. राममहेरने तलवार संदीपच्या पाठीत डाव्या बाजूने आरपार भोसकली. हा प्रकार पाहून संदीपचा भाऊ नितीन कागडा, मामा गणेश बलराम चावरिया आणि पत्नी सोनिया तेथे धावत आले. तेव्हा राहुलने खिशातील चाकूने गणेशच्या पोटात वार केला. या हल्ल्यात त्याच्या पोटातील आतडे बाहेर आले. त्यामुळे गणेश जमिनीवर कोसळला. तेवढ्यात पुन्हा तेथे आलेल्या मनोज ऊर्फ मिन्नू हरिकिशन कागडाने लोखंडी रॉडने नितीनच्या डोक्यात वार केला. तर विक्रम ऊर्फ बब्बल पालाराम कागडा याने दांड्याने त्याच्या डोक्यात वार केला. ही हाणामारी सुरू असतानाच तेथे आलेल्या अजय प्रेम कागडा आणि प्रेम हरिकिसन कागडा या दोघांनी सोनियाच्या छातीवर दांड्याने मारहाण केली. यानंतर प्रेम कागडाने त्यांच्यावर दगडफेक सुरू केली. हा प्रकार सुरू असताना परिसरातील अविनाश सूरज चावरिया, दीपक प्रदीप चावरिया आणि अन्नु बद्रीनारायण चावरिया यांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. चौघे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असताना स्थानिक नागरिकांनी घटनेची माहिती क्रांती चौक पोलिसांना कळवली. पोलिसांनी धाव घेत जखमींना घाटीत दाखल केले. या घटनेनंतर गांधीनगर भागात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला. तपासाची चक्रे फिरवत आरोपींना अटक केली. राहुल कागडा, राममहेर कागडा, मनोज कागडा, करण कागडा, अजय कागडा, नरेंद्र राममहेर कागडा, प्रेम कागडा यांच्याविरुद्ध क्रांती चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कागडा कुटुंबातील राहुल, राममहेर, मनोज, नरेंद्र अशा पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक विजय घेरडे करत आहेत. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, चाकू घेऊन रक्तबंबाळ अवस्थेत ‘तो’ पुन्हा घाटीत आला... 
बातम्या आणखी आहेत...