आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यकर्त्याने टीपदेताच बाळाच्या खुनाला वाचा फुुटली, अनैतिक संबंधातून जन्माला आले होते बाळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मिसारवाडी परिसरात ४० दिवसांपूर्वी उकिरड्यावर मृतावस्थेत सापडलेल्या एका दिवसाच्या मुलीचा तिच्या वैरीण मातेनेच खून केल्याचा उलगडा झाला आहे. तोंडात कापसाचा बोळा कोंबून तसेच नाक दाबून तिचा खून केल्याची कबुली अटक केलेल्या महिलेने दिली आहे. सिडको पोलिसांनी वैरीण मातेसह तिची प्रसूती करणाऱ्या दायीला अटक केली अाहे. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे राजकीय कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून हा गुन्हा उघडकीस आला आहे. माहिती देणाऱ्यास कारवाई करणाऱ्या पोलिसांना एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
२१ जुलै २०१६ रोजी एका दिवसाच्या स्त्री जातीच्या नवजात बालिकेचा मृतदेह मिसारवाडी येथील उकिरड्यावर पोलिसांना सापडला होता. अमितेशकुमार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत, सखोल चौकशीचे आदेश दिले होते. मागील दीड वर्षात अशीच १५ अर्भके सापडली आहेत. गेल्या सहा महिन्यांत सहा गुन्हे दाखल झाले आहेत. हे प्रकार कमी व्हावेत, डॉक्टरांनी पोलिसांना बाळंतिणीची माहिती द्यावी, असे आवाहन सहायक पोलिस आयुक्त खुशालचंद बाहेती यांनी केले होते. या प्रकरणी सोनोग्राफी सेंटरचालकांची बैठकही घेण्यात आली होती. त्याचीही हे प्रकरण उलगडवण्यात मदत झाली.

दरम्यान बिसमिल्लाची डीएनए तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली. बिसमिल्लाची प्रसूती हर्सूल परिसरातील शाहाजान बी या दायीने केली होती. पोलिसांनी तिलाही ताब्यात घेतले असून दोघींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिसमिल्लाचा पती घरफोडीच्या गुन्ह्यात मागील अडीच वर्षांपासून शिक्षा भोगत आहे. दरम्यान अनैतिक संबंधातून या मुलीचा जन्म झाल्याचे तिने जबाबात सांगितले.

नारेगाव परिसरातील नगरसेवक नागरिकांच्या संयुक्त बैठकीत चिमुरडी संदर्भातील सुमारे पंचवीस हजार पत्रके वाटून माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवले जाईल. तसेच त्याला ५० हजारांचे बक्षीस देण्याचे पोलिसांनी जाहीर केले होते. महिला तक्रार निवारणाच्या सहायक पोलिस निरीक्षक अर्चना पाटील यांनी महानगरपालिकेत सर्व जन्म नोंदीची तपासणी केली होती. या सर्व प्रयत्नांमुळे त्या चिमुरडीला बिसमिल्ला वसिम खान या महिलेने आणून टाकल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली. या माहितीच्याआधारे पोलिसांनी सोमवारी तिला ताब्यात घेतले. तिने या मुलीला २१ जून रोजी पहाटे वाजेच्या सुमारास जन्म दिल्याचे स्पष्ट झाले. मीच तिच्या तोंडात कापसाचा बोळा कोंबून ठार करून दुपारी दीड वाजेच्या सुमारास फेकून दिल्याची कबुली तिने दिली.

नगरसेवकांची बैठक ठरली निर्णायक
याप्रकरणाचा तपास करत असताना आयुक्तांनी रेडिओलॉजिस्टचा अहवाल, मनपातील जन्म नोंदी मागवल्या. तसेच नगरसेवक त्या भागातील पुढारी प्रतिष्ठित नागरिकांची बैठकही बोलावली. अशाच स्वरूपाचे गेल्या दीड वर्षात पंधरा गुन्हे दाखल असून, कुठल्याही गुन्ह्याचा तपास लागलेला नाही. अशा स्वरूपातील गुन्हा उघड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे तपास अधिकारी पोलिस निरीक्षक कैलास प्रजापती, उपनिरीक्षक सागर कोते, राजकुमार पाडवी, प्रतिभा अबूज, अल्का खंडागळे तसेच महिला पोलिस विभागाच्या सहायक निरीक्षक अर्चना पाटील यांच्यासह एका नागरिकास एक लाखाचे बक्षीस घोषित करण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...