आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबाद - पुस्तके विकता विकता बनावट चावीच्या साहाय्याने दुचाकी लांबवणार्या तरुणास गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करून अटक केली. त्याच्याकडून बजाज पल्सर आणि हीरो होंडा कंपनीच्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत. आकाश प्रकाश सावळे (24, रा. गल्ली क्र. 1, गजानननगर, गारखेडा) असे त्याचे नाव आहे.
सोमवारी आकाश गारखेड्यातील गजानन महाराज मंदिरासमोरून दुचाकीवरून भरधाव जात होता. त्याला गस्तीवरील गुन्हे शाखा पोलिसांनी पाठलाग करत जयभवानीनगर चौकात पकडले. त्याच्या जवळील दुचाकीची (एमएच-20-एएच-6269) चौकशी केली. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांना त्याचा संशय आला. त्यांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गारखेड्यातील रिलायन्स मॉलसमोरून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. ही दुचाकी कैलासनगरातील रघुनाथ केशवराव र्शीरामवार यांची असल्याचे निष्पन्न झाले. 16 फेब्रुवारीला सायंकाळी बनावट चावीने त्याने दुचाकी पळवली होती.
चार दुचाकी जप्त
दहावीपर्यंत शिक्षण घेतलेला आकाश पुस्तके विकतो. त्याच्याजवळ एक बनावट चावी आहे. या चावीच्या साहाय्याने त्याने 4 फेब्रुवारीला सिग्मा हॉस्पिटल येथून बायजीपुर्यातील रहिवासी सोहेब अब्दुल देशमुख वाहेद देशमुख यांची बजाज पल्सर दुचाकी (एमएच 19 एजे 4163) लांबवली होती. मध्यवर्ती बसस्थानकासमोरील हॉटेल पॅराडाइजसमोर उभी असलेली माता कॉलनीतील भाऊसाहेब कारभारी गायके यांची स्प्लेंडर दुचाकी (एमएच 20 सीए 1413) 5 फेब्रुवारीला चोरली होती, तर खंडपीठातील लिपिक रामराव हनुमंतराव वानोळे यांची पॅशन प्रो दुचाकी (एमएच 20 ए डब्ल्यू 212) गारखेड्यातील रिलायन्स मॉलसमोरून 9 फेब्रुवारीला चोरली होती. पेट्रोल संपल्यानंतर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणच्या पार्किंगमध्ये तो दुचाक्या उभ्या करत होता. पोलिस उपनिरीक्षक सुभाष खंडागळे, अजयकुमार पांडे, जमादार शेख आरेफ, देविदास राठोड, प्रकाश काळे, दिलीप माळी, सय्यद रफियोद्दीन व हिरासिंग राजपूत यांचा पथकात समावेश होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.