आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Jalana Police Take Action On Bullet Seller

काडतूस विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, जीवंत काडतुसांसह एकास अटक, तिघे फरार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- औरंगाबाद-बीडरोडवर शहागड येथून जवळच असलेल्या एका बिअर बारसमोर गावठी काडतूस विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला. दरम्यान, यातील एकास पोलिसांनी अटक केली असून उर्वरित तिघांनी पोलिसांच्या अंगावर चारचाकी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न करून पळ काढला. सोमवारी दुपारी ४.३० वाजता ही घटना घडली.

शहागडजवळील एका बिअर बार समोर पांढऱ्या रंगाच्या कारमधून काही अज्ञात लोक आले आहेत. त्यातील एकजण खाली उतरून काडतुसांसाठी ग्राहक शोधत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. यानुसार पीएसआय सुरेश भाले, स.पो.उपनिरीक्षक विश्वनाथ भिसे, कर्मचारी सॅम्युअल कांबळे, रामेश्वर बघाटे, कैलास कुरेवाड, सचिन चौधरी, सदा राठोड, हिरालाल फलटणकर, विलास चेके, वैभव खोकले, पूनम भट्ट यांनी घटनास्थळी पोहोचून सापळा रचला. दरम्यान, आकाश सदाशिव वडमारे (इंदिरानगर, बीड) हा त्याठिकाणी असलेल्या बिअरबारसमोर ग्राहक शोधत होता. याची खात्री पटल्यावर पोलिसांनी त्यास पिस्टलसह शिताफीने ताब्यात घेतले. मात्र, त्याने जवळ असलेले पिस्टल काढून पोलिसांनाच गोळ्या घालून जिवे मारण्याची धमकी दिली.

या वेळी पोलिसांनीही मोठ्या हिमतीने झडप घातली आकाशला पकडले. याचवेळी कारकडे पोलिस धावत सुटले असता, त्यातील अक्षय शामराव आठवले (माळीवेस, बीड), राहुल संजय वडमारे (राजुरीवेस, बीड) सचिन खेडेकर (सावरगाव ता.आष्टी, जि.बीड) यांनी थेट गाडीच पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिसांना चुकांडा देऊन भरधाव वेगात गाडी घेऊन पळून गेले. याप्रकरणी सहायक पोलिस उपनिरीक्षक विश्वनाथ भिसे यांच्या तक्रारीवरून गोंदी पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक सुरेश भाले हे करीत आहेत.

बीडसह, जालना इतर ठिकाणी शोध
प्राप्तमाहितीच्या अनुषंगाने गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी थेट बीड गाठले पळून गेलेल्या आरोपींचा शोध घेतला. मात्र, आरोपी सापडले नाही. दरम्यान, या टोळीतील लोकांनी जालना जिल्ह्यात कोणाला काडतूस किंवा पिस्टल विक्री केले आहे काय, यात स्थानिकचे कोण सहभागी आहेत काय, याचा तपास पोलिस करत आहे.
टोळीतीलआरोपींवर गंभीर गुन्हे दाखल
काडतूसबाळगल्याप्रकरणी आरोपी असलेले गुन्हेगार गंभीर गुन्ह्यांच्या सवयीचे असून त्यांच्यावर यापूर्वीही ठिकठिकाणी गुन्हे दाखल आहेत. बीड जिल्ह्यात त्यांची दहशत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.