आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या दलालास पकडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद- औरंगाबाद येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करणाऱ्या दलालास खुलताबाद पोलिसांसह औरंगाबाद ग्रामीण महिला दामिनी पथकाने म्हैसमाळ रोडवरील उरूस मैदानात सापळा रचून मुलीसह पकडले. याप्रकरणी दलालास अटक करण्यात आली असून अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी आरोपी नारायण निवृत्ती काशिदे (वय ३६, रा. वसमत, जि. हिंगोली. ह.मु. रांजणगाव, ता. गंगापूर) हा देवळाई चौक येथील शंभुराजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील १२ वीत शिकणारी विद्यार्थिनी (रा. शिरसगाव, ता. चाळीसगाव, जि. जळगाव. ह.मु. शिवाजीनगर, औरंगाबाद) हिच्याकडून बळजबरीने वेश्या व्यवसाय करवून घेत होता. व्यवसायातून मिळालेल्या पैशांतून उपजीविका भागवत होता. हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असल्याने याप्रकरणाची गुप्त माहिती औरंगाबाद ग्रामीण पोलिस महिला दामिनी पथकातील सपोनि राजश्री आडे यांना मिळाली. आडे यांनी त्वरित खुलताबाद पोलिस ठाण्यात याप्रकरणी माहिती दिली.

बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे व राजश्री आडे यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक मनीषा लटपटे यांनी बनावट ग्राहक तयार करून उरूस मैदानात खुलताबाद- म्हैसमाळ रोडलगत दलालास पकडण्यासाठी सापळा रचला. बनावट ग्राहकाला सहाशे रुपये देऊन सदरील दलालाकडे पाठवण्यात आले. बनावट ग्राहकाने मोबाइलवरून आरोपी नारायण काशिदे या दलालाशी संपर्क साधला. त्या वेळी त्याने एका विद्यार्थिनीला बनावट ग्राहकाकडे सोपवत असतानाच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी लगेचच झडप घालून दलाल व तरुणीस ताब्यात घेतले.

याप्रकरणी विद्यार्थिनीकडून पोलिसांनी माहिती घेतली असता काशिदे हा आमची इच्छा नसताना बळजबरीने आमच्याकडून हा व्यवसाय करून घेतो. मिळालेल्या पैशांतून काही पैसे आम्हाला देतो व बाकी स्वत: ठेवतो. याप्रकरणी खुलताबाद पोलिस दलालाची सखोल चौकशी करत असून आणखी किती मुली-तरुणी यात गुंतलेल्या आहेत याची माहिती घेत असून आरोपी काशिदे यास खुलताबाद पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक अभिजित मोरे अधिक तपास करत आहेत.
फसवणुकीचा फंडा
काशिदे हा दलाल असल्याचे समोर आले असून तरुणीला नोकरी किंवा पार्टटाइम जॉब लावून देतो असे सांगत असे. गरजू तरुणी किंवा महिला त्याच्या संपर्कात येेत होत्या. यातून तो त्यांचा प्रथम विश्वास संपादन करायचा व नंतर आपल्या जाळ्यात ओढून त्यांना वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करत असे. महिला किंवा तरुणी अशा कामास तयार झाली, तर ग्राहकांशी संपर्क साधून त्यांना इच्छित स्थळी पोहोचवत होता. यातून मिळणाऱ्या रकमेतून काही रक्कम महिलेस व बाकी स्वत:कडे ठेवून घ्यायचा.