आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, Aurangabad, Divya Marathi

पहाटेचा अलार्म लावून थंड डोक्याने पत्नीसह दोन मुलींचे गळे आवळले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज - मंगळवारी पहाटे सव्वातीनची वेळ.. मोबाइलचा अलार्म वाजला...ठरलेल्या योजनेनुसार त्याने साखरझोपेतील पत्नीचा गळा आवळला. त्यानंतर तो दोन्ही मुलींकडे वळला. शांत डोक्याने त्याने निर्दयीपणे दोघींचेही गळे आवळले. एका क्षणात त्याने पत्नीसह तिघींना संपवले अन् त्याच खोलीत सव्वादोन तास तो अस्वस्थपणे येरझरा घालत होता.


अंगावर शहारे आणणारी ही घटना बजाजनगरातील छत्रपतीनगरात घडली. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत जितेंद्र कौतिक धांडे (30, रा. राजोदा, ता. रावेर) याने पत्नी अश्विनी (28), मुलगी छाया ऊर्फ छकुली (3) व हर्षदा (नऊ महिने) यांची निर्घृणपणे हत्या केली. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी धांडेला अटक केली आहे.


जितेंद्र व त्याचा मोठा भाऊ संतोष हे दोघे छत्रपतीनगरात दोन मजली घरात राहतात. संतोष हे वाळूजमधील कंपनीत कामाला असून जितेंद्र गेल्या सहा वर्षांपासून चितेगाव एमआयडीसीतील कंपनीत कामाला आहे. जितेंद्र दुसर्‍या मजल्यावर राहतो. 20 मार्चला रात्री अकरा वाजेच्या सुमारास सर्व जण झोपेत असताना जितेंद्रने घराच्या जिन्यावरून एका अनोळखी व्यक्तीला खाली उतरताना पाहिले होते. तेव्हापासून त्याच्या मनात संशयाची पाल चुकचुकत होती. याबाबत त्याने पत्नी अश्विनीला काही विचारले नाही, पण तो अस्वस्थ होता. त्यानंतर मंगळवारी पहाटे त्याने पत्नी व दोन चिमुकल्यांचा जीव घेतला.


मृतदेहांशेजारी येरझरा
सोमवारी रात्री जितेंद्र, अश्विनी आणि त्यांच्या दोन मुली सर्व जण जेवण करून झोपण्यासाठी गेले. अनोळखी व्यक्तीबद्दल जितेंद्रने पत्नी अश्विनीला विचारणा केली, पण अश्विनीच्या उत्तरावरून त्याचे समाधान झाले नाही. नंतर त्याने काही न बोलता मोबाइलवर पहाटेचा अलार्म लावला. मनोमन त्याने पत्नीची हत्या करण्याची योजना आखली. त्यानुसार त्याने पहाटे सव्वातीनच्या सुमारास उठून अश्विनीचा गळा आवळून खून केला. ती गतप्राण झाल्याची खात्री झाल्यानंतर एकेक करून त्याने हर्षदा आणि छायालाही संपवले. यानंतरही जणू काही घडलेच नाही, अशा आविर्भावात तो मृतदेहांजवळ बसून होता. पहाटेचे साडेपाच झाले तरी कामावर जाण्यासाठी जितेंद्र खाली का आला नाही म्हणून संतोष यांनी वरच्या मजल्यावर जाऊन दरवाजा ठोठावला. तेव्हा अश्विनी, छाया, हर्षदा उठत नसल्याचे जितेंद्रने संतोषला सांगितले. संतोष यांनीही तिघांना उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा फायदा झाला नाही.


जितेंद्र संशयखोर!
सहा वर्षांपासून जितेंद्र चितेगावमधील कंपनीत कामाला होता. तो कोणाशी फारसा बोलत नसे. परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, तो नेहमी पत्नीवर संशय घेत असे. या कारणावरून अनेकदा त्यांच्यामध्ये वादही व्हायचे. 20 मार्चला घराबाहेर कोणीही आले नसल्याचे पत्नीने सांगितले होते. पण संशयी वृत्ती असल्याने त्याने पत्नीसह मुलींनाही संपवले.

भावाने जितेंद्रला बेदम चोपले
संतोष यांनी जितेंद्रला बेदम मारले. संतोष यांची पत्नी व दोन्ही मुलींनी तेथील दृश्य पाहून टाहो फोडला. तिघांना देविदास गोरे यांच्या इंडिका कारमध्ये संतोष आणि स्वत: जितेंद्रने घाटीत नेले; पण डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. पोलिस उपायुक्त डॉ. जय जाधव, सहायक पोलिस आयुक्त एस. बी. चौगुले, पोलिस निरीक्षक इंदलसिंग बहुरे यांनी पाहणी केली. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पोलिस उपनिरीक्षक एन. पी. शिंदे तपास करीत आहेत.