आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, Bhimshakti Sanghatna, Raju Jadhav, Divya Marathi

पूर्ववैमनस्यातून भीमशक्ती संघटनेच्या सचिवाचा भररस्त्यात खून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - भीमशक्ती संघटनेचे जिल्हा सचिव राजू यादवराव जाधव (44) यांच्यावर पूर्ववैमनस्यातून सोमवारी रात्री 10.40 वाजेच्या सुमारास तिघांनी चाकूने प्राणघातक हल्ला केला. यात गंभीर जखमी झालेल्या जाधव यांचा उपचारादरम्यान घाटीत मध्यरात्री पावणेदोन वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. जवाहरनगर पोलिसांनी मिलिंदनगर भागातून पाच तासांत तिन्ही मारेकर्‍यांच्या मुसक्या आवळल्या.


मिलिंदनगर भागातील जाधव यांच्या भाचीची याच परिसरातील सचिन सुरेश पगारे (28) छेड काढत होता. 15 दिवसांपूर्वी जाधव यांनी पगारेला मारहाण केली होती. मित्रांसमोर मारहाण केल्याने पगारेच्या मनात जाधवविषयी राग खदखदत होता. त्यामुळे पगारेने जाधव यांचा खून करण्याचे ठरवले. सोमवारी रात्री जाधव हे शिवाजीनगरकडे नातेवाइकांना भेटण्यासाठी जाणार असल्याचे पगारेला कळले. त्यामुळे तो अनिल प्रल्हाद बादाडे (20) आणि संदीप दादाराव जाधव (18, दोघेही रा. मिलिंदनगर) या साथीदारांसह चाणक्यपुरी रस्त्यावर तळ ठोकून होता. रात्री दुचाकीवरून (एमएच 20 एसी 862) जाणार्‍या जाधव यांना तिघांनी चाणक्यपुरीतील रेमंड शोरूमजवळ गाठून त्यांना दुचाकीवरून खाली खेचत बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. पगारेने त्याच्याजवळील चाकूने जाधव यांच्या गळ्यावर आणि छातीवर सपासप वार केले.


पोलिस ठाण्यासमोर जमाव
उस्मानपुरा, मिलिंदनगर परिसरातील कार्यकर्ते आणि नागरिकांनी जवाहरनगर पोलिस ठाण्यासमोर गर्दी केली होती. जाधव यांच्या मारेकर्‍यांना तत्काळ अटक करा, अशी घोषणाबाजी करण्यात आली. या वेळी निरीक्षक कदम यांनी मारेकर्‍यांची माहिती मिळाली असून, रात्रीतून त्यांना अटक करण्यात येईल, असा विश्वास दिल्यानंतर एक तासानंतर जमाव निघून गेला. पोलिसांना घटनास्थळी दुचाकीची चेन आणि चाकूचे चामडी कव्हर आढळले. मात्र, चाकू सापडला नाही.


पोलिसांनी केले घाटीत दाखल
जवाहरनगरचे बीट मार्शल पी.के. पवार यांनी जाधव यांना पाहून पोलिस नियंत्रण कक्षासह निरीक्षक हेमंत कदम यांना माहिती दिली. पोलिसांनी जाधव यांना तत्काळ घाटीत दाखल केले. तत्पूर्वी घाटीत नेत असतानाच पगारेने आपल्यावर चाकूहल्ला केल्याचे जाधव यांनी पोलिसांना सांगितले. पोलिस उपनिरीक्षक एल.डी. तावरे, कौतिक गोरे, मिलिंद धाडबळे यांनी तिघांना अटक केली.