शिऊर - वैजापूर तालुक्यातील औरंगाबाद-वैजापूर मार्गावरील ढेकू नदीच्या पुलावर हाडामांसाने भरलेले पाच ट्रक अज्ञात व्यक्तीकडून जाळण्यात आले होते. या घटनेस आठवडा उलटला तरी पोलिसांच्या हाती काहीच लागले नसल्याने अखेर अपर पोलिस अधीक्षक बसवराज तेली यांनी जळीत प्रकरणाचे धागेदोरे हाती लागावे यासाठी माहिती देणा-यास दहा हजार रुपये रोख बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.
२० सप्टेंबर रोजी औरंगाबाद-वैजापूर मार्गावरील ढेकू नदीच्या पुलावर हैदराबादहून मालेगावकडे हाड आणि मांस घेऊन जाणारे पाच ट्रक दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींकडून जाळून खाक करण्यात आल्याची घटना घडली होती. या वेळी विशेष पोलिस महानिरीक्षक अमितेश कुमार यांनी स्वत: घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला होता. यात पाच ट्रक चालक व दोन क्लीनर यांना ताब्यात घेऊन चौकशी केली होती. या प्रकरणी दुस-या दिवशी अज्ञात पाच आरोपींविरोधात शिऊर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासासाठी त्यांनी तीन पथके नेमली होती. मात्र, आठवडा उलटला तरी पोलिसांच्या हाती अजूनपर्यंत काहीच हाती लागले नसल्याने परिणामी दस्तुरखुद्द अपर पोलिस अधीक्षक बसवराज तेली यांनी या घटनेबाबत ठोस माहिती देणा-यास दहा हजारांचे रोख बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. माहिती देणा-यांचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असल्याचेही पोलिसांकडून कळवण्यात आले आहे.