आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, Liquor Store, Divya Marathi, Aurangabad

करमाडमधील ‘त्या’ मद्याच्या दुकान मालकावर गुन्हे दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर एसी अन् खादी देशीची व्यवस्था करणा-या करमाड येथील कल्पतरू या बिअर बारवर उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने आज सकाळी धाड टाकून कारवाई केली. अतिरिक्त पैसे आकारून दारू विकणे व वेळेआधी दुकान उघडणे या दोन कलमांखाली दुकानचालक दुर्गालाल जैस्वाल यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


करमाड गावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर दुर्गालाल जैस्वाल याची तीनमजली इमारत आहे. या इमारतीत वरच्या मजल्यावर एसी बार, दुस-या मजल्यावर बिअर शॉपी, तर खालच्या मजल्यात चक्क देशी दारूचे दुकान आहे. गेल्या 35 वर्षांपासून या दुकानांमुळे ग्रामस्थांना मद्यपींचा त्रास होतो. त्यामुळे गावक-यांनी उत्पादन शुल्क विभागापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत खेटे घातले, मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही. अखेर ग्रामस्थांनी डीबी स्टारकडे धाव घेतली. चमूने पाहणी करून या प्रकरणी ‘वर एसी अन् खाली देशी’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने आज मंगळवारी कल्पतरू बिअर बारच्या इमारतीत सकाळी 10 च्या सुमारास धाड टाकली. अधिका-यांनी या वेळी दुकानात बनावट ग्राहक पाठवला असता तेथे एमआरपीपेक्षा अधिक किमतीने माल विकला जात असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. तसेच दुकानाची 10 ची वेळ असताना सकाळी 8 वाजताच ते उघडण्यात आले होते. या दोन्ही गोष्टी नियमाला धरून नसल्याने विभागाने मालकाविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. पथकात विभागाचे अधीक्षक संतोष झगडे, उपअधीक्षक शिवाजी वानखेडे यांच्यासह 15 कर्मचा-यांचा समावेश होता.


अगोदरही तक्रारी आल्या होत्या
कल्पतरू बिअर बारसंबंधी अगोदर नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. या अनुषंगाने विभागाने दुकानावर कारवाई केली. नियमांचा भंग करून व्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
-शिवाजी वानखेडे, उपअधीक्षक, उत्पादन शुल्क विभाग