आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, Mangalsutra Theft Gang Catch By Police Issue At Aurangabad

मंगळसूत्र टोळीकडून 13 मंगळसूत्रे, दुचाकी जप्त; तिघे अटकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- दुचाकीवरून महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र पळवणार्‍या टोळीला पकडून त्यांच्याकडून 13 मंगळसूत्रे जप्त करण्यात आली. ही कारवाई गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी वाळूज परिसरात केली. मंगळसूत्रांसह बॅग पळवल्याची कबुली या टोळीने दिली असून तिघांना अटक करण्यात आली आहे.

गेल्या पाच महिन्यांपासून पोलिसांच्या नाकात दम आणणार्‍या तीन मंगळसूत्र चोरांना अखेर गुन्हे शाखेने पकडले. पोलिसांनी त्यांच्याकडून 13 मंगळसूत्र चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. राहुल कमलेश रेड्डी (21, रा. आलोकनगर, अय्यप्पा मंदिराजवळ, सातारा), विशाल भीमराव म्हस्के (20, रा. पंढरपूर) आणि गणेश रामदास पगारे (21, रा. एकतानगर, पंढरपूर) अशी त्यांची नावे आहेत. मुकुंदवाडीच्या मनपा शाळेतील शिक्षिका सुरेखा सुधीर भालेराव (50, रा. एन-6, अनंत कॉप्लेक्स, सिडको) या 24 फेब्रुवारी रोजी दुपारी शाळेतून रेल्वेस्टेशन रोडवरील एसएससी बोर्डाकडे स्कूटीवरून (एमएच 20 एके 9758) जात होत्या. या वेळी त्यांच्या गळ्यातील एक तोळ्याचे मंगळसूत्र पाठीमागून आलेल्या दोघांनी हिसकावत पळ काढला होता. हे हिसकावलेले मंगळसूत्र रेड्डी आणि म्हस्के विक्रीसाठी वाळूज परिसरातील एका सराफा व्यापार्‍याकडे जाणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन पवार यांना मिळाली होती. यावरून त्यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे, जमादार शेख राजेक, भास्कर ढगे, शेख हारुण, अरुण उगले, विष्णू उगले, शोण पवार, मंगेश मनोरे, भागवत सुरवाडे, शेख नवाब, शेख एजाज आणि विकी इंगळे यांनी वाळूज परिसरात सापळा रचला. खबर्‍याने सांगितलेल्या वर्णनानुसार पथकाने पल्सर दुचाकीवरून (एमएच 20 बीई 2113) जाणार्‍या दोघांना पकडले. या वेळी दोघांची अंगझडती घेण्यात आली. त्यांनी पोलिसांशी झटापट करण्याचा सुरुवातीला प्रयत्नही केला. परंतु पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी चोरलेले मंगळसूत्र लगेचच पोलिसांना दिले. याच्यानंतर त्यांचा साथीदार पगारे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांनी दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी 2 लाख 26 हजार रुपयांची 12 मंगळसूत्रे हस्तगत केली.

बॅग लिफ्टिंगची कबुली : या तिघांनी शहरातील जिन्सी, क्रांती चौक, जवाहरनगर, मुकुंदवाडी आणि उस्मानपुरा भागात सहा व इतर ठिकाणी सात अशा 13 ठिकाणी मंगळसूत्रे हिसकावली आहेत. तसेच पर्स चोरी आणि बॅग लिफ्टिंगचे गुन्हे केल्याचे पोलिसांना सांगितले आहे. त्यानुसार पोलिस त्यांच्याकडून गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तसेच आणखी मंगळसूत्र चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यताही पोलिसांनी वर्तवली आहे.