आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, Murder Of Son On Law, Divya Marathi

कुर्‍हाडीचा घाव, जावई ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड तालुक्यातील दिगाव खेडी येथील खळबळजनक घटना
सासरच्या मंडळींनी केलेल्या मारहाणीत जावई ठार, तर व्याही गंभीर जखमी झाला. कन्नड तालुक्यातील दिगाव खेडी येथे रविवारी ही धक्कादायक घटना घडली.
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून रात्री उशिरापर्यंत पिशोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
सय्यद अजीम ऊर्फ फारूक सय्यद सलीम (25) याने वर्षभरापूर्वी गावातील आपल्याच समाजातील मुलीशी कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन न्यायालयात नोंदणी पद्धतीने विवाह केला होता. त्यामुळे फारूकच्या घरची मंडळी सुनेस नांदवत नव्हती. फारूकची पत्नी तीन-चार महिन्यांपासून माहेरी राहत होती. फारूक ट्रकचालक असल्याने तो सतत बाहेर राहत होता. फारूकने मुलीला घेऊन सिल्लोड येथे राहावे असा तगादा त्याच्या सासरच्या मंडळींनी लावला होता. मात्र, फारूकने याला नकार दिला. या गोष्टीचा राग मनात धरून सासरच्या मंडळींनी रविवारी सकाळी फारूक गावातून शेतातील घराकडे जात असताना अचानक कुर्‍हाडीने हल्ला चढवला. आरडाओरड ऐकून फारूकचे वडील सय्यद अली (60) व चुलत भाऊ मिनाज धावून आले. या मारहाणीत फारूक जागीच ठार झाला, तर वडील सय्यद अली हे गंभीर जखमी झाले. त्यांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मारहाणीत पाच जण जखमी झाले.
याप्रकरणी पिशोर पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले आहे. सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद भातनाते हे जखमी सय्यद अली यांचा जबाब नोंदवण्यासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात गेले. पिशोर पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.