औरंगाबाद-आकर्षक जाहिरातीद्वारे पैसे व कार देण्याचे प्रलोभन दाखवत युनिक ग्रुपचा प्रेमचंद अशोक कांबळे याने नागरिकांना गंडवले. याविरोधात अनेकांनी ग्राहक तक्रार निवारण मंचात धाव घेतली. मंचाने व्याजासहित रक्कम परत करण्याचे आदेश कांबळे यास दिले होते. आदेशाचे पालन न केल्याने मंचाने कांबळेविरुद्ध 135 प्रकरणांत प्रत्येक केससाठी तीन महिने असा एकूण 405 महिन्यांचा कारावास व प्रत्येक प्रकरणात पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा त्याला सलगपणे भोगावी लागेल. गंडा घातल्याची एकूण रक्कम चार कोटी 5 लाख 51 हजार 577 एवढी आहे.
कांबळे याने विविध जाहिराती देऊन लोकांना आपल्या विविध योजनांमध्ये आर्थिक गुंतवणूक करण्यास आकर्षित केले. युनिक ग्रुपमध्ये आर्थिक गुंतवणूक करणारास आकर्षक व्याज व कार देण्याचे प्रलोभन दाखवण्यात आले होते. यामुळे शेकडो लोकांनी विविध योजनांमध्ये सहभाग घेतला होता.
ग्राहकांनी 3 ते 5 वर्षांसाठी काही रक्कम भरायची आणि त्यानंतर ठेवींवर त्यांना व्याज अथवा कार देण्याच्या भूलथापा त्याने मारल्या होत्या. गुंतवणूक करूनही अनेकांना जाहिरातीत केलेल्या दाव्यानुसार लाभ मिळाला नसल्याने त्यांनी ग्राहक तक्रार निवारण मंचात धाव घेतली.
भरपाई दिली नाही
ग्राहक तक्रार निवारण मंचाने आदेश देऊनही त्याची भरपाई होत नसल्याने ग्राहकांनी पुन्हा स्वतंत्र प्रकरणे दाखल करून रक्कम मिळावी यासाठी अर्ज केला. कांबळेने देय असलेली रक्कम ग्राहकांना देण्यात कुचराई केली. त्यामुळे आरोपीविरुद्ध 135 स्वतंत्र दरखास्त कारवाई दाखल केली. आरोपीस मंचासमोर हजर केल्यानंतर त्याने जामिनासाठी अर्ज केला व त्यास मंचाने सशर्त जामीन मंजूर केला. परंतु आरोपी रक्कम देण्याची शर्त पूर्ण करू शकला नाही.
ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 27 नुसार स्वतंत्र दरखास्त कारवाई दाखल केली. आरोपीस आरोपांची संक्षिप्त माहिती देण्यात आली.
प्रत्येक प्रकरणात स्वतंत्र शिक्षा
ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 27 अन्वये कांबळे हा प्रत्येक प्रकरणात स्वतंत्रपणे दोषी आहे. 135 प्रकरणांत कांबळेस शिक्षा देऊन प्रत्येक प्रकरणात स्वतंत्रपणे तीन महिने कारावास व प्रत्येक प्रकरणात पाच हजार रुपये दंड भरण्यात यावा. दंड न भरल्यास एक महिना कारावास भोगावा लागेल. प्रत्येक प्रकरणातील शिक्षा स्वतंत्रपणे भोगायची आहे. आरोपीस सर्व प्रकरणांमध्ये 1 ऑक्टोबर 2013 रोजी अटक केलेली असून त्याच्या तुरुंगवासाचा कालावधी मोजण्यात यावा.
मंचाने भरपाईचे दिले होते आदेश
ग्राहक मंचात 135 प्रकरणे दाखल झाल्यानंतर मंचाने सर्व प्रकरणांच्या गुंतवणुकीनुसार आदेश पारित केले होते. यात दीड लाख रुपयांपासून ते सहा ते सात लाख रुपये व्याजासह देण्याचे आदेश मंचाने 2008 व 2009 मध्ये पारित केले होते.
मालमत्ता दाखवावी लागेल
ग्राहकांचे वसुलीचे प्रकरण अद्याप जिवंत आहे. ग्राहकांना तक्रार निवारण मंचात दरखास्त दाखल करून मंचास आरोपीची मालमत्ता दाखवावी लागेल. त्यानंतर कुठल्या स्वरूपाची मालमत्ता आहे त्यानुसार ग्राहक मंच संबंधित संस्थेला जप्तीसंबंधी आदेश निर्गमित करेल. तेव्हा ग्राहकांची रक्कम मिळण्यासंबंधी मार्ग खुला होईल. अँड. सचिन सारडा.