औरंगाबाद - सेंट झेवियर्स शिक्षण संस्थाचालकाचा कारचालक व बसच्या क्लीनरने कट रचत पाच साथीदारांच्या मदतीने सिडको एन-1 मधील सेंट लॉरेन्स शाळेतून बँकेत भरण्यासाठी जाणारी 52 लाखांची रक्कम पळवली. शनिवारी सकाळी 10 वाजता ही घटना घडली. पोलिसांनी आठ तासांत आडूळजवळ चांदखेड्यातील शेतातून रक्कम हस्तगत केली आणि कटाचे सूत्रधार कारचालक, क्लीनर व त्यांच्या चार साथीदारांना अटक केली. टोळीतील आणखी एकाचा शोध सुरू आहे.
शनिवारी सेंट झेवियर्सचे प्रमुख कॉलिन्स अल्बुकर्क यांचा कारचालक विजय उमाजी सरोदे, स्कूलबसचा क्लीनर कृष्णा गोरखनाथ देवरे आणि व्यवस्थापक दीपक पद्मनाभ पुजारी (37, पारिजातनगर, एन-4, सिडको) शाळेबाहेर पडले. 500 मीटर अंतरावर रावदेव हॉस्पिटलजवळ कारला (एमएच 20 सीएस 1642) उजव्या बाजूच्या गल्लीतून आलेल्या दुचाकीने (एमएच 20 सीडी 9197) धडक दिली. दुचाकीवर ट्रिपल सीट आलेल्या आर्केश बाबूराव पगारेने कारचालक सरोदेला मारहाण सुरू केली. तर त्याच्या दोन साथीदारांनी कारमधील क्लीनर देवरेला शिवीगाळ केली. दरम्यान, पुजारी, सरोदे, देवरे कारमधून उतरले.
करिझ्मावर दोघे आले, रक्कम लुटून पसार
बाचाबाची सुरू असतानाच आर्केश व त्याचे साथीदार आले त्याच गल्लीतून करिझ्मा दुचाकीवर दोघे आले. कारमधील 52 लाखांची बॅग उचलून त्यांनी धूम ठोकली. गर्दीचा फायदा घेत आर्केशने पळ काढला. मात्र, पुजारींनी पाठलाग करत आर्केशला पकडले. एमआयडीसी सिडको पोलिसांना फोन केला.
कारचालक, क्लीनर अटकेत
पोलिसांनी आर्केशला ताब्यात घेतले. रात्री सहा वाजता रक्कम हस्तगत केली. आर्केशचा भाऊ सत्यवान, विनोद साळवे, पंडित ऊर्फ दाजी कांबळे यांना पकडले. त्यांच्या जबाबानंतर कटात सहभागी कारचालक सरोदे व कृष्णा देवरे यांनादेखील अटक करण्यात आली.
पुढे पाहा घटनेसंबंधित छायाचित्रे....