वैजापूर - आईचा पाहुणचार केला नाही म्हणून पत्नीस पेट्रोल टाकून जिवंत जाळणा-या नराधम पतीला येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. ए. कोठेकर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सुदाम सारंगधर राजगुरू (३५, रा. के-हाळा, ता. सिल्लोड, हल्ली मुक्काम श्रद्धा कॉलनी, वाळूज) असे जन्मठेप झालेल्याचे नाव आहे.
गंगापूर तालुक्यातील वाळूज येथील सुदाम राजगुरू हा
विवाह झाल्यापासून पत्नी रत्नमाला हिला दारू पिऊन शिवीगाळ करी आणि शारीरिक व मानसिक त्रास देत असे. सुदाम हा नेहमीनुसार ५ फेब्रुवारी २०१३ रोजी रात्री ८ वाजता दारू पिऊन घरी आला. त्या वेळी घरात पत्नी रत्नमाला व मुले स्वप्निल, अनिकेत व ऐश्वर्या असे चौघे होते. घरात आल्यावर त्याने रत्नमाला हिला "माझी आई माझ्या बहिणीकडे आली आहे, तू तिचा पाहुणचार का केला नाही?’ असे म्हणून तिला शिवीगाळ केली. त्यावर रत्नमाला हिने "आई दोन-तीन दिवस राहणार आहे. सिलिंडर संपले आहे. उद्या-परवा पाहुणचार करीन,’ असे सांगितले असता सुदाम याने चिडून जाऊन तिला पेटवले होते.