आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marthi, Bamboozlement Issue At Aurangabad, Divya Marahti

सख्ख्या मेहुण्याने वनक्षेत्रपालासह त्याच्या डॉक्टर मुलालाही अडकवले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - निवृत्त वनक्षेत्रपाल शरद तुपे यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याची तक्रार त्यांचे मेहुणे अण्णासाहेब मुदगल यांनी चार वर्षांपूर्वी केली होती. सख्ख्या मेहुण्यानेच तुपे यांच्यावर जाळे टाकल्याने तुपे आणि त्यांच्या डॉक्टर मुलाला कोट्यवधींची मालमत्ता बाळगल्याच्या आरोपाखाली लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली आहे.

तुपे यांनी नोकरीच्या काळात डॉक्टर मुलगा, पत्नी व चार मुलींच्या नावावर कोळघर, सातारा परिसर, छावणी, पैठण तालुक्यातील घारदोन या ठिकाणी बेकायदा मालमत्ता जमवल्याचे उघड झाले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी पहाटे पाच वाजेपासून पिंप्रीराजा, सातारा, कोळघर येथील त्यांच्या घरांची झडती घेतली. त्यात एक कोटी सहा लाख 23 हजार 800 रुपयांची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे निष्पन्न झाले आहे.
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे 1977 मध्ये वनपाल म्हणून तुपे नोकरीला लागले. त्यानंतर त्यांना एप्रिल 2004 मध्ये वनक्षेत्रपाल म्हणून पदोन्नती मिळाली. त्यानंतरच त्यांनी बहुतेक ठिकाणी जमिनी विकत घेतल्या. 2008 पर्यंत त्यांनी कोळघर येथे 6 एकर 19 गुंठे शेती स्वत:च्या नावावर घेतली. तसेच पत्नी पद्मा यांच्या नावे 12 एकर 35 गुंठे, मुलगा डॉ. शरदच्या नावे 8 एकर 11 गुंठे मुलगी जयर्शीच्या नावे 6 एकर 20 गुंठे, सुजाताच्या (रा. सातारा परिसर) नावे 4 एकर 7 गुंठे, सुनीता र्शीरंग औचरमलच्या (रा. घारदोन, ता. पैठण) नावे 5 एकर 37 गुंठे आणि मीना मनोज नितनवरेच्या (रा. लक्ष्मी कॉलनी, छावणी) नावे 5 एकर 20 गुंठे शेती खरेदी केल्याचे उघड झाले आहे. त्यातील काही शेतीमध्ये बारा लाख रुपये पाइपलाइनवर खर्च करण्यात आला. तसेच दहा लाख रुपयांचे शेततळे व ठिबक सिंचन केलेले आहे. कोळघरला सुमारे बारा लाख रुपयांचे घर तुपेंनी शेतात बांधले आहे. शिवाय मुलगा डॉ. शरद याला दोनमजली हॉस्पिटल बांधून दिले आहे. सातारा येथील गट क्र. 95 मधील प्लॉटवर 33 लाख रुपये खचरून घर बांधले असून, त्यामध्ये आठ दुकाने काढली आहेत. तर 2002 मध्ये ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील देवदर्शन अपार्टमेंटमध्ये चार लाख 10 हजार रुपयांचा फ्लॅट खरेदी केला. चार बँकांमधील 15 खात्यांमध्ये किती रक्कम आहे याचीदेखील माहिती एसीबी घेत आहेत. आज सकाळी पाच वाजेपासून दुपारी दीड वाजेपर्यंत एसीबी झाडाझडती घेत होती. दरम्यान, र्शीधर व शरद तुपे यांना आठ मेपर्यंत पोलिस कोठडी देण्याचे आदेश अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस.जी. शेट्ये यांनी दिले. सरकारपक्षातर्फे अँड. एस. एम. रझवी यांनी काम पाहिले. कोळघर आणि सातारा येथे उपअधीक्षक सुरेश वानखेडे, रामनाथ चोपडे, प्रताप शिकारे, साईनाथ ठोंबरे, प्रवीण मोरे, जालन्याचे एच.व्ही. गिरमे, निरीक्षक एस.ए.एस. सय्यद, श्यामसुंदर कौठाळे, किशोर पवार, ए.व्ही. रायकर, नीलेश देसले, श्यामसुंदर टाक यांनी ही कारवाई केली.
2010 मध्ये तक्रार
तुपेंकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याची तक्रार त्यांचे सख्खे मेहुणे अण्णासाहेब मुदगल यांनी 2010 मध्ये लाचलुचपत विभागाकडे केली होती. त्या वेळी सध्या गुन्हे शाखेत कार्यरत असलेले निरीक्षक रामेश्वर थोरात यांनी या तक्रारअर्जाची चौकशी केली होती. या तक्रारीचा अहवाल 2011 मध्ये मुंबईतील महासंचालकांना सादर करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा चौकशीअंती मंगळवारी ही कारवाई करण्यात आली.

शेतामध्ये भव्य गोठा व वाहने
तुपेंचा कोळघर येथील मळा प्रसिद्ध आहे. त्यांच्या शेतात दोन घोडे, ससे, 45 जर्सी गायी, 15 म्हशी आहेत. त्यांच्या रखवालीसाठी चार मजूरही या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. तसेच क्वालिस, स्कॉर्पिओ, कमांडर जीप, ट्रॅक्टर आणि बुलेट आहे.