आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुक्तांचा दावा: पुणे, नागपूरच्या तुलनेत औरंगाबादेत गुन्ह्यांचे प्रमाण कमी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- गेल्या वर्षभरात शहरात मंगळसूत्र हिसकावण्याच्या 60 घटना घडल्या आहेत; पण मुंबई, पुणे, नाशिक या शहरांची आकडेवारी पाहता आपल्याकडील या गुन्ह्यांचे प्रमाण कमी आहे, असे औरंगाबादकरांच्या भुवया उंचावणारे वक्तव्य प्रत्यक्ष पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी शुक्रवारी केले.

लायन्स क्लबच्या वतीने पोलिस ठाण्यांना वॉटर कूलर भेट देण्यात आले. त्या वेळी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मंगळसूत्र हिसकावण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्याला आळा घालण्यासाठी लोकांना सहकार्याचे आवाहन करण्यापलीकडे पोलिसांनी फारसे काहीही केलेले नाही. या मुद्दय़ाला बगल देण्यासाठी त्यांनी इतर शहरांचा संदर्भ दिला.

ते पुढे म्हणाले, वाढती लोकसंख्या, महागाई, बेरोजगारी अशा विविध समस्यांमुळे गुन्हेगारी मोठय़ा प्रमाणात वाढत आहे, पण तसे असले तरी इतर शहरांच्या तुलनेत आपल्या शहरात गुन्हे कमी आहेत.

मुंबईत गेल्या वर्षात मंगळसूत्र हिसकावण्याच्या 1200 घटनांची नोंद आहे. त्याचप्रमाणे नागपुरात 800, पुण्यात 450 आणि नाशिकमध्ये 300 घटना घडल्या आहेत. त्या तुलनेत औरंगाबादेत गेल्या वर्षात 60 घटना घडल्या आहेत. त्यातही 34 मंगळसूत्रे जप्त केली आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. मात्र, आयुक्तांनी उल्लेख केलेल्या इतर महानगरांची लोकसंख्या आणि औरंगाबाद शहराची लोकसंख्या यामध्येही मोठी तफावत असल्याचा उल्लेख केला नाही.

पोलिस आयुक्त म्हणतात, पोलिसांवर मोठा ताण

पाच तासही झोप नाही
इतर विभागांच्या तुलनेत पोलिस विभागाला अधिक काम असते.
24 तास हा विभाग जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतो. त्यामुळे त्यांच्या पर्शिमाविषयी जाणीव ठेवावी.
पोलिस ठाण्यात जायला घाबरू नका.
कायदा आपल्या भल्यासाठी तयार झाला आहे, त्याचे पालन करा.
गुन्हेगारी संपवण्यासाठी कायद्याची मदत घ्या, त्यासाठी पोलिस ठाण्यात जाण्यास घाबरू नका.

महानगरांची तुलना औरंगाबादबरोबर कशी?
2011 मध्ये केलेल्या जनगणनेच्या प्राथमिक अहवालानुसार पुण्याची लोकसंख्या 40 लाखांच्या घरात आहे. नागपूरची लोकसंख्याही तेवढीच अर्थात 40 लाख आहे. मागील वर्षभरात चेन स्नॅचिंगच्या पुण्यात 450, तर नागपुरात 800 घटना घडल्या. औरंगाबादची लोकसंख्या 12 लाखांवर असली तरी ती या महानगरांच्या निम्मीही नाही. असे असताना आयुक्तांनी गुन्ह्यांबाबत औरंगाबादची तुलना केलीच कशी, अशी चर्चा या वेळी ऐकावयास मिळाली.