आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैशांचा मोह नाही; गुन्हेगार जेरबंद होण्यातच स्वारस्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - आरोपींचा सुगावा लावण्यासाठी ‘स्केच’ तपासातील महत्त्वाचा भाग मानला जातो. ‘स्केच’आधारेच गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात अनेकदा पोलिसांना यश मिळते. सर्व गुन्ह्यांतील स्केच काढणारे तथा कायम पोलिसांच्या हाकेला ‘ओ’ देणार्‍या कपिल गणकवार या चित्रकाराने सध्या मंगळसूत्र चोरट्यांची सर्वाधिक रेखाटने काढावी लागतात, असे म्हटले आहे. पैशांच्या मोहापायी नाही, तर गुन्हेगारांना जेरबंद करण्यासाठी आपल्या कलेचा वापर होतो, याचा आपल्याला सार्थ अभिमान असल्याचे गणकवार यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकर्‍यांचे स्केच जारी करून पंधरा दिवस उलटले तरीही पोलिसांना आरोपींचा सुगावा लागला नाही. परंतु, स्केचच्या आधारे आरोपी लवकरच जेरबंद होऊ शकतात, असा विश्वास गणकवार यांनी व्यक्त केला. शहर आणि ग्रामीण पोलिसांसाठी रेखाटने काढणारे कपिल यांच्याशी ‘दिव्य मराठी’ने संवाद साधला असता अनेक अस्पष्ट ‘रेषां’ची ओळख त्यांनी करून दिली. प्रत्यक्षदर्शीच्या वर्णनावरून तयार केलेल्या ‘स्केच’मध्ये केसांच्या रचनेला अधिक महत्त्व दिले जात नाही. त्याशिवाय कपडे आणि मिशांनाही काहीच महत्त्व नसते. मिशा, केसांच्या रचनेत स्केच जारी झाल्यानंतर गुन्हेगार बदल करून उजळ माथ्याने फिरू शकतो, अशी शक्यता गृहीत धरूनच ओळख न पुसता येणार्‍या खाणाखुणांना अधिक महत्त्व द्यायला हवे, असे गणकवार यांनी म्हटले. हनुवटीतील खड्डा, गालांमध्ये पडणारी खळी, गळ्यातून बाहेर दिसणारे हाड, चेहर्‍यावरील व्रण उदा. म्हस, तीळ, जन्मखूण आदी ओळख जाणीवपूर्वक रेखाटावी लागते. बावीस वर्षांपासून गणकवार पोलिसांसाठी चित्रे काढत आहेत.

आतापर्यंत सर्वाधिक 60 रेखाचित्रे मंगळसूत्र चोरांचीच
सोने दुप्पट करून देण्याचा बहाणा करणार्‍या आरोपींचे 1989 मध्ये पहिले स्केच त्यांनी काढून दिले होते. त्याशिवाय मागील बावीस वर्षांत खून, बलात्कार, दरोडा, चोरी, चोरीचा प्रयत्न आदी गुन्ह्यांतील आरोपींची रेखाचित्रे त्यांनी काढली आहेत. मात्र, मागील काही वर्षांत त्यांच्याकडून सर्वाधिक ‘स्केचेस’ मंगळसूत्र चोरांची काढून घेण्यात आली आहेत.

125 स्केचपैकी 65 आरोपींच्या मुसक्या आवळण्यात रेखाचित्रांचे यश
125 पैकी 65 स्केचेस मंगळसूत्र चोरांची काढली आहेत. ‘स्केच’साठी पोलिस अधिकारी देतील तो मोबदला खिशात घालून आपण घरी जातो, मात्र पाचशे रुपयांपेक्षा अधिक मोबदला कधीही मिळाला नाही, असेही त्यांनी नमूद केले. श्रुती भागवत खून प्रकरणात लॉजमध्ये थांबलेल्या आणि घटनास्थळावर रिक्षामध्ये आलेल्या एका संशयिताचे स्केचही गणकवार यांनी काढून दिले होते.


अद्याप रबर वापरले नाही
इयत्ता पाचवीपासून चित्रकलेची आवड असलेल्या गणकवार यांनी दहावीनंतर शासकीय चित्रकला महाविद्यालयातून फाइन आर्ट्सचे शिक्षण घेतले. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या वर्णनानुसार रेखाचित्रे काढल्यानंतर ‘हाच होता किंवा असाच होता, साहेब’ असे म्हटल्यानंतरच आपण स्केच थांबवतो, असे गणकवार म्हणाले. एका प्रकरणात एकापेक्षा अधिक स्केचेस काढण्याची गरजच काय, रबरचादेखील वापर केला नाही, असे गणकवार यांनी सांगितले.