आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅरीबॅग बनवणाऱ्या कंपन्यांवर थेट गुन्हे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - कचऱ्यामुळे शहराचाच कचरा झाला आहे, अशा भावना व्यक्त करत आज सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी या विषयावर तब्बल दोन तास विचारमंथन केले. आयुक्तांनी सगळ्यांच्या बोलण्याची दखल घेत कचरा तयार होणारच नाही यासाठी लोकांनाही बदलावे लागेल, असे सांगत वाळूज पॅटर्न शहरात राबवण्याचा निर्धार व्यक्त केला. एवढेच नव्हे, तर प्लॅस्टिक बंदीचे पुढचे पाऊल म्हणून जानेवारीनंतर प्लॅस्टिकच्या कॅरिबॅग दिसल्या तर उत्पादक कंपन्यांवर गुन्हे दाखल करू, असे जाहीर केले.

घनकचरा व्यवस्थापनाची यंत्रणा सक्षम करण्यासाठी १२५ वाहनांची खरेदी करण्यासाठी राज्य शासनाने १४ व्या वित्त आयोगाकडून १०० टक्के अनुदान द्यावे, अशी मागणी करणारा प्रशासनाचा प्रस्ताव आजच्या सर्वसाधारण सभेत चर्चेला आला होता. त्यावर बोलताना सदस्यांनी कचऱ्याबाबत सविस्तर चर्चा केली. बहुतेक सगळ्या नगरसेवकांनी त्यावर तोडगा काढण्याची मागणी केली. त्यात कचरा कुंड्यांची कमतरता, पुरेसे कर्मचारी नसणे, विशिष्ट नगरसेवकांनाच हवे तितके कर्मचारी मिळणे, वाहनांची अपुरी संख्या, नारेगावातील समस्या आदींवर भर दिला. या चर्चेत विकास जैन, नंदकुमार घोडेले, विरोधी पक्षनेते जहांगीर खान, राजू शिंदे, राजू वैद्य, राज वानखेडे, कैलास गायकवाड, कीर्ती शिंदे, एटीएके शेख, नासेर सिद्दिकी, प्रमोद राठोड, दिलीप थोरात, गजानन बारवाल, शिल्पाराणी वाडकर, मीना गायके, ज्योती पिंजरकर, अॅड. माधुरी अदवंत यांच्यासह अनेक नगरसेवकांनी भाग घेतला.

या चर्चेतील अनेक विषयांची दखल घेत आयुक्तांनी शहर कचरामुक्त करण्याचा निर्धार व्यक्त करताना आपण मनपाची यंत्रणा आधी ठीक करत आहोत, आता नागरिकांची मानसिकताही बदलावी लागणार आहे, असे सांगितले. वाळूज पॅटर्न तेथे छोट्या प्रमाणावर असल्याने यशस्वी झाला. शहरात तो यशस्वी करणे अवघड असले तरी आपण ते करू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केंद्रेकर म्हणाले की, नुसत्या गाड्या वाढवून काय होणार आहे? उलट १२५ गाड्या घेऊन नारेगावात पाठवायच्या का, याचाही विचार करावा लागणार आहे. जागोजाग कचऱ्याच्या निर्मूलनाचा पर्यायच वापरावा लागणार आहे. शहराच्या बेजबाबदारपणाचे ओझे नाेरगाव वाहत आहे, असे सांगून ते म्हणाले की, गाड्या घेता येतील; पण कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जागा मिळणे अवघड आहे.

सिडकोकडून कुंड्या उसन्या
अनेक नगरसेवकांनी वाॅर्डात कचरा कुंड्या द्या, अशी मागणी केली याचा उल्लेख करत आयुक्त म्हणाले की, महापालिकेकडे कुंड्या नाहीत. सिडकोकडून २० कुंड्या उसन्या घेणार आहोत. त्या जिथे गरज आहे तेथे देऊ.

शहर घाण करायला हातभार लावू नका
शहरात कचरा निर्माण करणाऱ्यांनाही आता हे थांबवा, असे सांगण्याची वेळ आल्याचे आयुक्त म्हणाले. ते म्हणाले की, शहर घाण करण्यात हातभार लावू नका, हे सांगावे लागणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगवर बंदी आणण्यात येणार आहे. ३१ डिसंेबरपर्यंत कॅरीबॅगचा विषय संपवा, असे व्यापाऱ्यांना सांगण्यात आले आहे. जानेवारीपासून शहरात एकही कॅरीबॅग दिसली तर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. प्लॅस्टिक कॅरीबॅग तयार करणाऱ्या १२ कंपन्यांची यादी आम्ही तयार केली आहे. जानेवारीनंतर शहरात कॅरीबॅग दिसल्या तर या कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. तसे जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात येईल, असेही केंद्रेकर म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...