आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Criminal Dnyaneshwar Pingale Escsape From Jail Aurangabad

पिंपळे पलायन : पोलिसांवर संशय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मोक्का कायद्यांतर्गत हसरूल कारागृहात शिक्षा भोगणारा कुख्यात गुन्हेगार ज्ञानेश्वर पिंपळे (27, रा. चिकलठाणा) हा मंगळवारी (24 डिसेंबर) रात्री नऊच्या सुमारास हसरूल कारागृहाच्या परिसरातून पसार झाल्याचे सांगितले जात आहे. परंतु तो नेमका कोठून पसार झाला याबद्दल पोलिस अधिकारी साशंकता व्यक्त करत आहेत. त्यामागील कारणेदेखील तशीच असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अजयकुमार पांडे यांचे पथक श्रीरामपूर, राहाताला रवाना झाले आहे.

तीन गुन्ह्यांच्या सुनावणीदरम्यान हसरूल कारागृहात बंदी असलेल्या ज्ञानेश्वर पिंपळेला मंगळवारी सकाळी आठ वाजता हसरूल कारागृहात सशस्त्रधारी पोलिसांसह राहाता न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. त्यानंतर दुपारी साडेचारच्या सुमारास सहायक फौजदार गोपीनाथ गंगावणे, जमादार सुनील प्रधान आणि शिपाई विश्वास निकम हे तिघे त्याला घेऊन राहाता येथून श्रीरामपूरला आले. तेथून ते एसटी बसने औरंगाबादला आले असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, पिंपळे हा श्रीरामपूरहूनच फरार झाला असावा, असा अंदाज अधिकारी व्यक्त करत आहेत. ताब्यात आरोपी असताना सशस्त्रधारी जमादार प्रधान यांनी रात्री आठ वाजता पोलिस मुख्यालयात रायफल जमा केली. त्यानंतर हे तिघेही विनाशस्त्र मोक्कातील या खतरनाक गुन्हेगाराला सिटी बसने घेऊन हसरूल कारागृहाकडे गेले कसे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. हसरूल कारागृहाच्या पहिल्या एंट्री गेटजवळ एक कर्मचारी 24 तास तैनात असतो. कारागृह अधीक्षकांच्या बंगल्याजवळदेखील दोन पोलिस तैनात असतात. असे असतानाही पिंपळे कसा निसटला हादेखील मुद्दा विचार करण्यासारखा असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

वॉरंटवरून लागेल सुगावा
आरोपीला न्यायालयासमोर हजर करताना न्यायालयाशिवाय पोलिसांचेदेखील वॉरंट असते. मंगळवारी मुख्यालयातील पोलिसांना आरोपीला घेऊन जाण्यासाठी पोलिस निरीक्षकांच्या स्वाक्षरीचे वॉरंट देण्यात आले होते. प्रवास करताना किती व्यक्ती आहेत त्याप्रमाणे वाहकाकडून तिकीट घेतले जाते. त्यामुळे श्रीरामपूरहून औरंगाबादला येईपर्यंत पिंपळे त्यांच्यासोबत होता की नाही ? हे आता वॉरंटवरूनच स्पष्ट होईल, असे एका अधिकार्‍याने सांगितले.