आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई-वडिलांशी बोलताना पिंपळे झाला पसार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - हर्सूल कारागृह, श्रीरामपूर नव्हे, तर चिकलठाणा विमानतळासमोरील पेट्रोल पंपापासून कुटुंबीयांशी बोलताना मोक्कातील गुन्हेगार ज्ञानेश्वर पिंपळे पळाल्याचे अखेर शनिवारी चौकशीत सिद्ध झाले. मात्र, या वेळी त्याच्या हाताला बेड्या वा दोरखंड नव्हता हेही तितकेच खरे. पिंपळे आणि पोलिसांमध्ये संगनमत होऊन आर्थिक तडजोड झाली असावी, असा दावा पोलिस अधिकार्‍यांनी केला आहे. दरम्यान, कर्तव्यात कसूर करणार्‍या या तिन्ही निलंबित पोलिसांवर बडतर्फ किंवा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई होण्याची शक्यता पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी वर्तवली आहे.

24 डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता सहायक फौजदार गोपीनाथ गंगावणे, जमादार सुनील प्रधान आणि शिपाई विश्वास निकम यांनी पिंपळेला हसरूल कारागृहातून ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी औरंगाबाद ते शिर्डीपर्यंतच्या प्रवासाचे वॉरंट फाडले. नेवासा बसस्थानकावर पिंपळेची पत्नी मेनका, टाटा सुमो जीप ठरवून देणारा मध्यस्थी रवी चव्हाण आणि चालक नंदू हिरालाल गणगे असे जीपमध्ये (एमएच 26 व्ही 1808) बसलेले होते. पोलिस पिंपळेसह जीपने राहाता न्यायालयात गेले. कामकाज आटोपत असतानाच या तिघांपैकी एका पोलिसाने राहाता बसस्थानकावरून श्रीरामपूरपर्यंतच्या प्रवासाचे चौघांचे वॉरंट फाडले. चारच्या सुमारास मेनका, पिंपळे, चव्हाण आणि पोलिस जीपने श्रीरामपूरला आले.

हॉटेलमध्ये त्यांनी पिंपळेची बेडी उघडली. यानंतर सर्वांनी जेवण केले. नंतर जीपने हे सगळे थेट श्रीरामपूर बसस्थानकावर गेले. तेथेही पोलिसांनी श्रीरामपूर ते औरंगाबाद बसचे वॉरंट फाडले. सायंकाळी सहाच्या सुमारास हे सगळे औरंगाबादच्या दिशेने निघाले, तर चव्हाण हा प्रवरा संगम येथे उतरला. रात्री पावणेआठच्या सुमारास मेनका, पिंपळे आणि पोलिस आयुक्तालयाजवळ आले. यानंतर निकमने मुख्यालयात एसएलआर रायफल जमा केली. पोलिस पिंपळेसह जीपने जालना रोडला लागले. मेनका मुकुंदवाडी चौकात उतरली, तर पिंपळेचे आई-वडील व बहीण त्याला भेटण्यासाठी विमानतळासमोरील पेट्रोल पंपाजवळ वाट बघत होते. जीपमधून उतरताच पोलिसांनी पिंपळेची हातकडी काढली. या वेळी बोलता बोलता पिंपळेने धूम ठोकली.