आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरचौकात ते त्याला मारत होते अन‌् जमाव पाहत होता, बेदम मारहाणीमुळे मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पतीच्या मृत्यूनंतर लता मुळे यांनी हंबरडा फोडला. - Divya Marathi
पतीच्या मृत्यूनंतर लता मुळे यांनी हंबरडा फोडला.
औरंगाबाद - भारतनगर (गारखेडा) येथील चौक. गुरुवारी (२५ जून) रात्री आठचा सुमार. एका किराणा दुकानदाराला नऊ जण लाथाबुक्यांनी मारहाण करत होते. ते पाहून जमाव जमला. तो मदतीसाठी याचना करत होता. त्याचे कुटुंबीयही कुणीतरी धावा हो, असा टाहो फोडत होते. मात्र जमावातील कोणीही मदतीसाठी पुढे आलेच नाही. मारहाण सुरु असतांना कोणाला पोलिसांना साधा एक फोनही करावासा वाटला नाही.
सुमारे पंधरा मिनिटानंतर मारहाण करणारे निघून गेले. या मारहाणीमुळे किराणा दुकानदार भालचंद्र काशीनाथ मुळे (४५) यांचा शुक्रवारी पहाटे मृत्यू झाला. त्यांची पत्नी लता मुळे यांच्या फिर्यादीवरून विठ्ठल पारटकर, भिवराज काटे, दिगंबर वैराळ, विशाल गायकवाड, भिमाशंकर कोरडे, विशाल गायकवाडचा मोठा भाऊ नाव माहीती नाही, अजय आडे, छोट्या उर्फ अशोक वैद्य, नारायण लहानप्पा पारटकर यांच्याविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यातील नारायण पारटकर, भीमाशंकर कोरडेला पोलिस निरीक्षक नाथा जाधव यांच्या सह कल्याण शेळके, बनकर, परशूराम सोनवणे, शौण पवार, राहूल हिवराळे यांच्या पथकाने अटक केली.

घराबाहेर बोलावले : तू पैसे मागण्यासाठी तांबे यांच्या घरी का गेला, असे म्हणत जमलेल्या नऊ जणांनी मुळे यांना घराबाहेर बोलावून चौकात मारहाण करण्यास सुरुवात केली. मुळे यांची आई, बायको मध्ये पडले असता त्यांनाही मारहाण करत बाजूला ढकलून दिले. शिवाय ‘मधे कोणी पडाल तर यादा राखा’ अशी धमकीदेखील जमलेल्या लोकांना दिली. जमाव थोडा मागे हटताच मुळे यांच्या पोटात लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. नगरसेवक निवडणूकीच्या वेळी खूप माज आला होता का आता कसा सापडला असे मारहाण करणारे म्हणत असल्याचे मुळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

नातेवाईक संतप्त : या घटनेनंतर मुळेंच्या संतप्त नातेवाइकांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात मारहाण करणा-या लोकांना तत्काळ अटक करा. तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही असे सांगितले. सहायक पोलिस आयुक्त सुखदेव चौगुले, पोलिस निरीक्षक नाथा जाधव यांनी घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी नऊ जणांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर मुळेंचे नातेवाईक काहीसे शांत झाले.

काय घ्यावी काळजी : पोटात मुकामार लागल्यास सोनोग्राफी आणि सिटीस्कॅन करायला हवे. हळुवारपणे होणारा रक्तस्राव सोनोग्राफीत तत्काळ दिसून येत नाही, पण सिटीस्कॅनमुळे लवकर निदान होते. अंतर्गत रक्तस्राव रोखण्यासाठी शस्त्रक्रिया हा एकमेव उपाय आहे. यकृतातून रक्तस्राव असल्यास जेलफोम टाकून रक्तस्राव बंद केला जातो. याशिवायही इतर अनेक उपाय आहेत, ते रुग्णाची परिस्थिती पाहून ठरवावे लागतात. पण, तत्काळ रुग्णालयात दाखल होणे आणि डॉक्टरांच्या निरीक्षणात राहणे गरजेचे असते.

पुढे वाचा.. राजकीय वैमनस्यातून प्रकार घडल्याची चर्चा