आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crowd For Corporators Candiature, Bagde Supporters Ignored

नगरसेवकपदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी, बागडे समर्थकांना डावलले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी २१०६ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवसेना-भाजपचे युतीचे गुऱ्हाळ लांबल्यामुळे शेवटच्या दिवशी बंडखाेरांना फारशी संधी मिळणार नाही, असा कयास पक्षांनी लावला होता. असे असले तरी शिवसेना, भाजप आणि एमआयएम या तिन्ही पक्षांत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याचे दिसून आले. दिवसभर अर्जातील कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांची धावपळ दिसून आली.

मनपा निवडणुकीत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील आठ वॉर्डांमध्ये त्यांच्या समर्थकांना डावलण्यात आले आहे. कामगार कॉलनी, म्हाडा कॉलनीतील बागडे समर्थक बाळासाहेब पुंडे यांच्या बी फॉर्मवर ऐनवेळी बळीराम कदम नाव टाकण्यात आले. चिकलठाणा येथे बागडे यांनी चंद्रकला सातपुतेंची शिफारस केली. त्यांच्याएेवजी ज्योती नाडेंना उमेदवारी देण्यात आली.
पुंडेंना पळवले : पुंडे यांना बी फॉर्म देण्याचे बागडे यांनी आमदार अतुल सावेंना सांगितले, तर सावेंनी आमदार नारायण कुचे यांना भेटण्यास सांगितले. कुचेंनी त्यांना शहराध्यक्ष भगवान घडामोडेंकडे पाठवले. ते घडामोडेंकडे पोहोचले. तेव्हा बी फॉर्म बळीराम कदम यांना देऊन घडामोडेंनी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. चौधरी कॉलनीतून मारुती धोत्रे यांच्या कुटुंबातील सदस्याऐवजी विद्यमान नगरसेवक संजय चौधरी यांच्या पत्नीस उमेदवारी देण्यात आली.
खोतकरांना फिरवले : भाजप-शिवसेना युती होत नसल्याचे मुकुंदवाडीचे दीपक खोतकर यांना सांगून त्यांना ज्ञानेश्वर कॉलनी येथून उमेदवारी मागण्यास सांगितले. उपरोक्त वॉर्ड शिवसेनेला सुटल्याने खोतकर यांची संधी हुकली. शेजारच्या अंबिकानगरातून खोतकर यांनी दावा करू नये यासाठी त्यांना ज्ञानेश्वर कॉलनीचे गाजर दाखवण्यात आले. अंबिकानगरातून बागडे समर्थक किसन ठुबे व आत्माराम ठुबे यांचा पत्ता कट करून रामभाऊ ठुबे यांना उमेदवारी दिली.
भाजपत असंतोष :सिडको एन-३, ४ मध्ये काँग्रेसमधून आलेले प्रमोद राठोड यांच्या उमेदवारीस स्थानिक पदाधिका-यांनी विरोध केला. बारापेक्षा जास्त पदाधिका-यांनी पदाधिका-यास उमेदवारी द्यावी अशी अट घातली. यामुळे पदाधिका-यांपुढे झुकत भाजपने राठोड यांना विश्रांतीनगर येथून उमेदवारी दिली. परंतु विरोध करणा-या पदाधिका-यांना उमेदवारी न देता एन-९ सिडको येथे राहणा-या अॅड. माधुरी अदवंत-देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली. पंकजा पालवे यांनी शिफारस केलेल्या शिवानी सतीश नागरे यांचाही विचार केला नाही. स्थानिक शिवाजी शिरसे, मुकुंद दामोदरे, प्रभाकर मोपलवार, जयश्री किवळेकर, सिमरनकौर बिंद्रा यांना विचारात घेतले नाही.

श्रेष्ठी नमले
ठाकरेनगरात दामोदर शिंदे यांना पक्षात घेण्याचा रोष भाजप प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी आेढवून घेतला. ठाकरेनगरातील भाजप पदाधिका-यांनी भोकरदन येथे जाऊन दानवेंची भेट घेत शिंदे यांच्या पत्नी सत्यभामा यांना उमेदवारी देण्यास विरोध केला. पक्षात घेतले उमेदवारीचे वचन दिले नसल्याचे दानवे यांनी सांगून पदाधिका-यांची समजूत काढली होती.

घात केला
आपण वीस वर्षांपासून भाजपमध्ये काम करीत असून उमेदवारी देण्यासंबंधी प्रदेशाध्यक्षांसह आमदार सावे, आमदार कुचे व घडामोडे यांना बागडेंनी सूचना केलेल्या असताना मुद्दामहून डावलण्यात आले. मी १३ हजार ६३३ सदस्यांची नोंदणी केली.
बाळासाहेब सावळेराम पुंडे.