आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इजिप्तमधील तणावामुळे कच्च्या तेलाच्या दरात वाढ, महागाईने मात्र ग्राहक त्रस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - इजिप्तमधील राजकीय संकटाने कच्च्या तेलाचा भडका उडाला असून, बुधवारी त्याची किंमत बॅरलमागे 100 डॉलरवर पोहोचली. सप्टेंबर 2012 नंतर प्रथमच ही दरवाढ आहे. यामुळे डॉलरला बळ मिळून रुपयाने पुन्हा एकदा साठीची पातळी ओलांडली. परिणामी देशातील महागाई वाढण्याची चिन्हे आहेत. पेट्रोल, डिझेल, अन्नधान्याच्या किमतीवर परिणाम होणार आहे. कच्च्या तेलाच्या किमती बॅरलमागे 1.40 डॉलरने वाढल्या. दहा महिन्यांनंतर कच्च्या तेलाने शंभरी पार केली. भारतीय अर्थव्यवस्थेवर याचे गंभीर परिणाम होतील, असे मत औरंगाबाद येथील आनंद राठी ब्रोकर्सचे वरिष्ठ व्यवस्थापक विश्वनाथ बोदाडे यांनी व्यक्त केले. न्यूयॉर्क मर्कंटाइल एक्स्चेंज बाजारात कच्चे तेल भडकले. त्याचे पडसाद आपल्याकडे महागाई वाढणे, परकीय गंगाजळी घटणे, विकास दर मंदावणे, गुंतवणूक थंडावणे असे उमटतील, असे बोदाडे म्हणाले.


भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम : महागाई वाढते, अनुदानाच्या रूपात सरकारी खर्च वाढतो, परकीय गंगाजळी आटते, निर्यात मंदावते. सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) घसरते. गुंतवणूक आटते.


कच्चे तेल आहे काय? : विशिष्ट खडकात सापडणारे हे नैसर्गिक खनिज. कार्बन आणि हायड्रोजनने बनलेले हे खनिज हायड्रोकार्बन स्वरूपाचे आहे. अत्यंत ज्वलनशील आहे. पेट्रोलियम उत्पादनाचा हा कच्चा माल आहे. लॅटिन भाषेत पेट्रा म्हणजे खडक आणि ओलियम म्हणजे तेल.


कच्चे तेल आणि महागाई : 2008 मध्ये कच्च्या तेलाच्या किमती बॅरलमागे 100 डॉलरवर गेल्या होत्या. तेव्हा देशातील महागाईने 12.27 टक्के हा आजवरचा उच्चांक गाठला होता.


कच्चे तेल भडकण्याचे कारण :
इजिप्तमध्ये राष्ट्राध्यक्ष मोर्सी यांनी लष्कराचा प्रस्ताव फेटाळला. हिंसक आंदोलने होत आहेत. कच्चे तेल वाहतूक होणारा सुएझ कालवा तसेच मेडिटेरियन पाइपलाइनवर इजिप्तचे नियंत्रण आहे.
अमेरिकेतून 94 लाख बॅरल पुरवठा घटू शकतो.


ग्राहकांवर परिणाम
*कच्चे तेल भडकल्याने आयात महागते.
* पेट्रोल, डिझेल, रॉकेलच्या किमती वाढतात.
* नित्याच्या वस्तू, अन्नधान्यांचे भाव वधारतात.
* ग्राहकोपयोगी वस्तूंचे दर वाढतात.
* कार, जीप, ट्रक व इतर वाहने महागतात.
* सार्वजनिक वाहतूक महागते.
* महागाईने जीवनशैली बिघडते.