आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मला पाहा अन् फुलं वाहा!\' सांस्कृतिक भवनामध्ये चालतेय रुग्णालयाचे कामकाज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिवसा- परिसरातील सुमारे २५ गावांतील नागरिकांना आरोग्याची सोय उपलब्ध व्हावी या उद्देशाने तळेगाव ठाकूर येथे तीन वर्षांपूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्र बांधण्यात आले. यामुळे गावातील नागरिकांच्या आशाही पल्लवित झाल्या होत्या. परंतु, आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या उद््घाटनाचा मुहूर्त अद्यापही शासनाच्या 'पंचांगात' सापडत नसल्यामुळे या रुग्णालयाची गत सध्या 'मला पाहा अन् फुलं वाहा' अशी झाली आहे. रुग्णालय सुरू झाल्यामुळे लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या तरण्या इमारतीचे वय वाढत आहे.

तळेगाव ठाकूर येथे २००८-०९ मध्ये मंजूर झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम २०१२ मध्ये पूर्ण झाले. सध्या तळेगाव ठाकूर येथील आरोग्य केंद्राचा कारभार सांस्कृतिक भवनात सुरू असून, येथे अपुऱ्या जागेमुळे रुग्ण नागरिकांची हेळसांड होत आहे. रुग्णालय बांधून तयार असूनही ते सुरू होण्यासाठी प्रशासनाच्या वतीने कोणतीच हालचाल दिसून येत नसल्यामुळे ही इमारत केवळ शोभेची वास्तू ठरली आहे. रुग्णालय सुरू झाल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना उपचारासाठी तिवसा गाठावे लागत आहे. दरम्यान, रुग्णालय त्वरित सुरू करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आरोग्य केंद्र आता नवीन इमारतीत स्थानांतरित करावे, या मागणीचे निवेदन नागरिकांनी गटविकास अधिकारी धायगुडे यांना देऊन आंदोलनाचा इशारा दिला.
प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत प्रशस्त असल्यामुळे पंचवीस खाटांची व्यवस्था होऊ शकते. जवळपास २५ गावांची भिस्त या आरोग्य केंद्रावर आहे. बांधकाम विभागाच्या म्हणण्यानुसार रस्त्याचे काम रखडले होते. आता काम अंतिम टप्प्यात आले. त्यामुळे आरोग्य विभागाला ही इमारत सुपूर्द करण्यात आली आहे.

परंतु, जिल्हा प्रशासनाकडून रुग्णालय सुरू करण्याच्या कोणत्याच हालचाली होत नसल्यामुळे कोट्यवधी रुपयांची इमारत धूळ खात पडली आहे.

तळेगाव ठाकूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची ही इमारत तीन वर्षांपासून बांधून पूर्ण झाली आहे. परंतु, ितचे अद्यापही उद्घाटन झाल्यामुळे ती अशी धूळ खात पडली आहे.