आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cultural Programe At Aurangabad Congress Committee

काँग्रेसचे दिवाळी स्नेहमिलन, दर्डांसाठी ‘मुसाफिर हूं यारों.’, तर पालकमंत्री थोरात यांचे ‘जय हो’!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसने हिंदूंनाही जास्तीत जास्त संख्येने पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचा प्रत्यय आज (रविवारी) आला. खुद्द पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनीच ईदमिलनचे कार्यक्रम यापूर्वी झालेले, आता दीपावली स्नेहमिलनाचा यंदा सुरू केलेला महाराष्ट्रातील हा पहिलाच कार्यक्रम असल्याचे सांगून तसे संकेत दिले.

औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष अँड. सय्यद अक्रम यांनी पक्षाच्या वतीने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत शहानूरमियाँ दर्गाजवळील श्रीहरी पार्कमध्ये रविवारी सायंकाळी दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास सर्वप्रथम शालेय शिक्षणमंत्री दर्डा यांचे आगमन झाले. कार्यक्रम स्थळी वन मॅन आर्मी असलेल्या प्यारेलाल यांच्या गीताचा कार्यक्रम सुरू होता. दर्डा यांचे आगमन होताच प्यारेलाल यांनी ‘मुसाफिर हूं यारों..’ हे गीत सुरू केले. कार्यक्रमासाठी आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये एकच खुसपूस सुरू झाली. जणू या गीतातील बोलाप्रमाणे ते वागत असल्याची चर्चा सुरू झाली. पहिल्यांदाच होत असलेला हा स्नेहमिलन कार्यक्रम म्हणजे औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघ ताब्यात घेण्याची तयारी दिसून आली. सूतगिरणी ते दग्र्यापर्यंतचा संपूर्ण परिसर काँग्रेसमय करण्यात आला होता. राखीव असलेल्या मतदारसंघातून पक्षाच्या वतीने उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक असलेल्यांनी कार्यकर्त्यांसोबत नेत्यांसमोर शक्तिप्रदर्शन केले.

यंदा वरच्यांची कृपा :
काँग्रेस या परिसरात येऊच शकत नाही, असा समज असणार्‍यांना आमची ताकद दाखवून देण्यासाठीच हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला. यंदा वरच्याने (देवाने) औरंगाबादवर कृपा केल्याने हा कार्यक्रम घेतला, असे म्हणताच सर्वच नेत्यांनी पालकमंत्री थोरात यांच्याकडे नजरा वळवताच एकच हशा पिकला. तेव्हा आमदार एम. एम. शेख यांनी मध्यस्थी करत वरचे म्हणजे ‘ते’ नाही, असे स्पष्ट करत बाजू सावरली.

काँग्रेसच्या या कार्यक्रमात कार्यकर्त्यांशिवाय अराजकीय नागरिक आल्याचे पाहून संधी साधली. कमी शब्दांत भाषण ठोकत आगामी निवडणुकीत काँग्रेसला साथ देण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमास आमदार कल्याण काळे, एम. एम. शेख, सुभाष झाबंड, माजी खासदार उत्तमसिंग पवार, जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे, राजकुमार जाधव, अँड. पवन डोंगरे यांच्यासह आजी-माजी नेत्यांची उपस्थिती होती.

तुम्हारे खत में हमारा सलाम! : दर्डा यांच्या वाढदिवसानिमित्त गजानन महाराज मंदिराजवळ इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संधीचे सोने करत दर्डा सर्मथकांनी कार्यक्रमस्थळी दोन रिक्षा उभ्या करून प्रसिद्धी करून घेतली.

पक्षातील दुफळी पुन्हा चव्हाट्यावर
शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांचे ‘मुसाफिर हूं यारों, ना घर है ना ठिकाना’, तर पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांचे ‘जय हो’ या गीताने काँग्रेसच्या वतीने आयोजित कार्यक्रमात स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमात अनेकांनी ‘दर्डासाहब आगे बढो’ अशा घोषणा देऊन काँग्रेसमधील दुफळीचे दर्शन घडवून दिले, तर ज्येष्ठांनी हा कार्यक्रम विशिष्ट गटाचाच असल्याची चर्चा रंगवली.

महाराष्ट्रातील पहिलाच कार्यक्रम - थोरात
काँग्रेसच्या वतीने आतापर्यंत ईदमिलनचेच कार्यक्रम झालेले आहेत. मात्र, अशा प्रकारचा दिवाळी स्नेहमिलनचा कार्यक्रम आयोजित करून शहराध्यक्ष अक्रम यांनी चांगला पायंडा पाडला आहे. पक्षाच्या वतीने महाराष्ट्रात कधीच असा कार्यक्रम झालेला नाही, असे पालकमंत्री थोरात म्हणाले.