आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नऊ कलाविष्कारांनी गाजला महोत्सवाचा पहिला दिवस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पोवाडा, लोकनाट्यातील खोडसाळ टीका, कसलेला मूक अभिनय, नृत्यातील ठेका, संगीतातील गोड स्वर आणि चित्रांच्या दुनियेत रमलेले तरुण चित्रकार अशा वातावरणात विद्यापीठाचा परिसर बहरून गेला होता. 1500 कलावंतांचा वावर आणि 35 कलाप्रकारांनी विद्यापीठाचे वातावरण भारावून गेले होते. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी नऊ कलाप्रकार सादर झाले. अनेक महिन्यांच्या तालमीनंतर नटराजाला नमन करून युवक महोत्सवाची सुरुवात केली. औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद जिल्ह्यांच्या विविध गावांतून आलेल्या तरुण कलावंतांनी युवक महोत्सवात सहभाग घेतला आहे.

सकाळी साडेदहा वाजता सुरू झालेले कलावंतांचे सादरीकरण रात्री बारा वाजेपर्यंत सुरू होते. विशेष म्हणजे तरुणांच्या सादरीकरणाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. पहिल्या दिवशी समूहगायन, भजन, शास्त्रीय तालवाद्य, एकांकिका, प्रश्नमंजूषा, इन्स्टॉलेशन, आदिवासी नृत्य, शास्त्रीय सूरवाद्य आणि स्पॉट फोटोग्राफी या कला प्रकारांचे सादरीकरण झाले.

कॅन्व्हासवर साकारला विद्यापीठाचा निसर्ग
विद्यापीठाचा निसर्गरम्य परिसर प्रत्येकाला डोळ्यांत साठवावासा वाटतो. तरुण चित्रकारांनादेखील याची भुरळ पडली. लँडस्केप स्पर्धेसाठी अनेक कलावंतांनी हा निसर्ग जसाच्या तसा कॅन्व्हासवर चितारला. आपल्या कलेत रममाण झालेले चित्रकार या महोत्सवातील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. विद्यापीठातील परिसर हा लँडस्केपसाठी विषय देण्यात आला होता. औरंगाबादच्या लेणी, डोंगर आणि झाडांनी बहरलेले रस्ते असे दृश्य या तरुण चित्रकारांनी कॅन्व्हासवर उतरवले.

शाहिरांनी केला स्त्रीशक्तीचा जागर
रुबाबदार फेटा, खडा आवाज आणि सुरेल साथीने युवा शाहिरांनी सोनेरी महालाच्या साक्षीने स्त्रीशक्तीचा जागर केला. परस्त्री ही मातेसमान अशी शिकवण देणारे शिवाजी महाराज आणि स्त्रियांना शिक्षणाची कास धरायला लावणा-या सावित्रीबाई फुले आदींचे कार्य वीररसातून युवा शाहिरांनी रसिकांसमोर सादर केले. स्त्री भ्रूणहत्या, हुंडाबळी, स्त्रियांवरील अत्याचार आणि समाजातील उदासीनतेवर शाहिरांनी टीका केली. अनेक संघांचे सादरीकरण अंगावर रोमांच आणणारे होते.

क्रिएटिव्ह डान्समधून सामाजिक संदेश
तरुणांच्या कलाविष्काराचा आणि सामाजिक संवेदनांचा आविष्कार बघायला मिळाला तो क्रिएटिव्ह नृत्याच्या रंगमंचावर. फेसबुकवर होणारी तरुणींची फसवणूक आदी सामाजिक विषय मांडण्यात आले. मानवाची उत्पत्ती करणा-या पृथ्वीच्या मुळावरच माणूस कसा उठला आहे हे देवगिरी महाविद्यालयाच्या कलाकारांनी नृत्यातून सादर केले. मृदंगाची साथसंगत आणि कलावंतांचे सादरीकरण अंगावर शहारे आणणारे होते. प्रा. अनिलकुमार साळवे यांनी या थीमचे लिखाण केले होते. हे सादरीकरण पहिल्या दिवशीचे आकर्षण ठरले. याच व्यासपीठावर बहारदार शास्त्रीय नृत्याचा अनुभवदेखील रसिकांनी घेतला. पहिल्या दिवशी विद्यापीठ परिसर कलावंतांनी बहरून गेला होता.

बॉलीवूड स्टार, राजकारण्यांची नक्कल

टाळ्या आणि शिट्यांनी दाद मिळाली ती मिमिक्रीच्या रंगमंचाला. निळू फुले, दादा कोंडके, शाहरुख खान, सुनील शेट्टी, नाना पाटेकर, शरद पवार, अजित पवार, गोपीनाथ मुंडे, राज ठाकरे अशा मातब्बर मंडळींचे हुबेहूब आवाज कलावंतांनी या व्यासपीठावर काढून प्रेक्षकांची दाद मिळवली. ग्रामीण भागातून आलेल्या तरुणांनीदेखील प्राण्यांचे विविध आवाज काढून प्रेक्षकांची दाद मिळवली. विनोदातून सध्याच्या परिस्थितीवर मिश्कील टीका करून मनोरंजन केले.