आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड हजार कलावंतांचा तीन दिवस ‘जलसा’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- तरुणाईचा कलाविष्कार असलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन पोलिस आयुक्त संजयकुमार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे होते. ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. विभागातील शंभर महाविद्यालयांतील दीड हजार कलावंतांनी महोत्सवात सहभाग नोंदवला. अकरा वर्षांनंतर विद्यापीठाने युवक महोत्सवाचे यजमानपद स्वीकारले आहे. व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. तीन दिवस कलावंतांचा जलसा राहणार आहे.

रविवारी सकाळी नाट्यगृहात औपचारिक कार्यक्रमाने महोत्सवाचे उद्घाटन झाले. या वेळी कुलसचिव धनराज माने, विद्यार्थी कल्याण विभागाच्या संचालक डॉ. चेतना सोनकांबळे, विद्यार्थी प्रतिनिधी करुणा जाधव, व्यवस्थापन सदस्या डॉ. प्रतिभा पाटील, शिवाजी मदन, महाराज किशन साहिब, दत्तात्रय आघाव, रत्नदीप देशमुख, मोहंमद फैयाज, कल्याण लघाने, भारत हंडीबाग, विलास खंदारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पोलिस आयुक्त संजयकुमार यांनीदेखील युवक महोत्सवाला साजेल आणि युवकांचे प्रोत्साहन वाढेल असे मार्गदर्शन केले. कवी दुष्यंत यांच्या काव्यपंक्ती आणि जयप्रकाश नारायण यांनी उभी केलेली तरुणांची चळवळ याशिवाय स्वत:च्या आयुष्यातील काही प्रसंग त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले. सूत्रसंचालन प्रा. समाधान इंगळे यांनी केले, तर आभार करुणा जाधव यांनी मानले.

युवाशक्‍तीला योग्‍य वळण अपेक्षित
युवाशक्तीला योग्य वळण दिल्यास जगातील सर्वात तरुण देश म्हणून भारत ओळखला जाईल. युवाशक्तीला दिशा देण्याची जबाबदारी वैचारिक आणि बुद्धिजीवी समाजघटकांवर आहे. पालकांनीही विचार पाल्यांवर न लादता त्यांच्या आवडीनुसार करिअर घडवण्याची संधी द्यायला हवी. सचिन तेंडुलकरचा आदर्श आज तरुणांसमोर आहे. त्यामुळे त्यांना मागे वळून बघण्याची गरज नाही. कवी दुष्यंतानी म्हटले आहे की, कौन कहता है आसमान में छेद नही होता, एक पत्थर तबियतसे उछालो तो यारो.. - संजयकुमार, पोलिस आयुक्त

या स्‍पर्धा म्‍हणजे शोध घेण्‍याचे साधन
महाविद्यालयात शिकवले जाते म्हणजे नेमके काय केले जाते, तर विद्यार्थ्यांना स्वत:ला कसे ओळखायचे याचे प्रशिक्षण दिले जाते. गेल्या अनेक वर्षांत युवकमहोत्सवात यश मिळवलेल्या कलावंतांचे पुढे काय झाले, याचा शोध घ्यायला हवा. एखादा मकरंद अनासपुरे होतो. मात्र, ज्यांना स्ट्रगल करूनही यश मिळाले नाही, त्यांची कारणे शोधणे आवश्यक आहे. - प्राचार्य रा. रं. बोराडे, ज्येष्ठ साहित्यिक

स्‍कुल ऑफ लिबर्टीची उभारणी करणार
कला आणि विज्ञान यांची सांगड घालणे आवश्यक आहे. कला शाखेतील विद्यार्थ्यांना विज्ञानाची आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनादेखील कलेतील आनंद घेता यावा यासाठी स्कूल ऑफ लिबर्टीच्या उभारणीसाठी विद्यापीठ पुढाकार घेणार आहे. परदेशात असे प्रशिक्षण दिले जाते. - डॉ. विजय पांढरीपांडे, कुलगुरू, विद्यापीठ