आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभ्यास करत नसल्याची तक्रार केली म्हणून मावसभावाचा खून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अभ्यास करत नसल्याची तक्रार पालकांकडे केली म्हणून कॉलेज विद्यार्थ्याने मावसभावाचा खून केल्याची घटना सोमवारी बालाजीनगरात घडली. या दुर्दैवी मुलाचे नाव शुभम बारोटे असून, मावसभाऊ अजय (नाव बदललेले) याने वायरने गळा आवळून त्याचा खून केल्याचा आरोप आहे. दोघांचेही वय 17 वर्षे असून, ते जालना जिल्ह्याचे रहिवासी आहेत.
भोकरदन तालुक्याच्या शेलूद येथील शुभमने देवगिरी महाविद्यालयात 2012-13 या शैक्षणिक सत्रात अकरावीसाठी प्रवेश घेतला होता. तत्पूर्वी त्याने परतूर येथील जवाहर नवोदय विद्यालयातून दहावीपर्यंत शिक्षण घेतले. शेजारच्या वरूड गावचा मावशीच्या जावेचा मुलगा अजयनेही देवगिरी महाविद्यालयातच प्रवेश घेतला होता. त्याचे शिक्षण अहमदपूर (लातूर) येथील शाळेत झाले. दीड वर्षापूर्वी दोघांनीही सौजन्यनगरातील दिगंबर काथार (63) यांच्या इमारतीतील पहिल्या मजल्यावरील खोली भाड्याने घेतली होती. महाविद्यालय, कोचिंग क्लासेसचे वर्ग आणि उस्मानपु-यातील अभ्यासिकेतून रात्री उशिरा रूमवर येण्याचा शुभमचा नित्यक्रम होता. शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे शुभम रात्री बारा वाजता अभ्यास करून घरी आला. त्या वेळी पहिल्या मजल्यावरील दुस-या खोलीत राहणा-या मित्रांशी शुभमने झोपण्यापूर्वी मध्यरात्रीपर्यंत गप्पा मारल्या, असे त्याच्या मित्रांनी सांगितले.
शुभम अजयपेक्षा हुशार : शुभम हा अत्यंत हुशार विद्यार्थी होता, असे घरमालक आणि त्याच्या मित्रांनी सांगितले. दरम्यान, चांगले शिक्षण घेऊन भवितव्य घडवण्यासाठी शहरात आलेल्या या मावसभावांमध्ये अनेक दिवसांपासून तणाव होता. शुभम अजयपेक्षा अभ्यासात हुशार होता, त्यामुळे अजयला त्याच्याबद्दल असूया होती, असा पोलिसांचा कयास आहे. अभ्यास न करता वेगळेच उपद्व्याप करणा-या अजयच्या पालकांकडे शुभमने काही दिवसांपूर्वी तक्रार केली होती, असे सूत्रांचे म्हणणे आहे. या तक्रारीचा राग आणि शैक्षणिक द्वेषातून शुभमला संपवण्याचा कट अजयने रचला असावा. खोलीवर झोपण्यासाठी येणा-या मित्रांना शनिवारी अजयने मज्जाव केला होता.
पुराव्यांसाठी पोलिसांना विद्यार्थ्यांची मदत
जवाहरनगर पोलिसांनी रविवारी रात्री शुभमचा मृतदेह घाटीत दाखल करून आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली होती. मात्र, खून झाल्याचे सोमवारी निष्पन्न झाल्यामुळे पोलिसांनी दिवसभर पुरावे गोळा केले. पोलिस उपायुक्त अरविंद चावरिया, सहायक पोलिस आयुक्त विजय पवार, जनाहरनगर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक भारत कदम, खुनाच्या तपासासाठी नेमलेल्या पथकाचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, बालाजी सोनटक्के आणि अशोक कदम यांनी घटनास्थळावर धाव घेतली. तपास अधिकारी अशोक कदम यांनी 20 पेक्षा अधिक पुरावे गोळा केले आहेत. शासकीय न्यायवैद्यकशास्त्र महाविद्यालयाचे विभागप्रमुख हरेंद्रकुमार बांबुर्डे यांच्यासह दहा विद्यार्थ्यांनी पुराव्यांसाठी पोलिसांना मदत केली.
डायरीत लिहिले होते...डॉक्टर होणार, आयएएस अधिकारी बनणार !
शुभम सातवीपर्यंत गावातील जि.प. शाळेत शिकला. पुढे परतूरच्या नवोदय विद्यालयात शिक्षण घेतले. प्रज्ञाशोध परीक्षेत 89 टक्के, तर दहावीत त्याला 90 टक्के गुण होते. देवगिरी कॉलेजात अकरावी विज्ञानला त्याने प्रवेश घेतला. एनआयआयटी होऊन बारावीनंतर मेडिकलला जाण्याची त्याची इच्छा होती. डॉक्टर झाल्यानंतर त्याने आयएएस होण्याचा संकल्पही छोट्या डायरीत सुंदर हस्ताक्षरात लिहून ठेवला होता.