आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राहकांची गरज ओळखूनच शेतकऱ्यांनी उत्पादन घ्यावे : दांगट यांचे आवाहन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेवटच्या दिवशी प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. - Divya Marathi
शेवटच्या दिवशी प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
 
औरंगाबाद: शेतकऱ्यांनी कोणत्याही पिकाचे उत्पादन घेण्याऐवजी ग्राहकाला काय हवे, चांगली बाजारपेठ आहे का याचा विचार करूनच उत्पादन घ्यावे, असे आवाहन माजी विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी केले. अॅडव्हांटेज महाराष्ट्र एक्स्पोच्या चर्चासत्रात ते बोलत होते. 
 
रविवारी कलाग्राममध्ये अॅग्रो अँड फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. उद्घाटनप्रसंगी आमदार सतीश चव्हाण, महाराष्ट्र बँकेचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आर. पी. मराठे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड, नाथ ग्रुपचे चंद्रशेखर पाठक, नाशिक येथील सह्याद्री अॅग्रोचे विलास शिंदे, प्रवीण मसालेचे आनंद चोरडिया यांची उपस्थिती होती. 

मराठवाड्यात मसाला उद्योगाला संधी : दांगट म्हणाले की, मराठवाड्यात हळद, मिरची, धने, अद्रक, कारळ, जवस, शेंगदाणे यासह मसाल्यासाठी लागणारे सर्व उत्पादने घेतली जातात. त्यामुळे मसाला उद्योगासाठी मराठवाड्यात संधी आहे.
 
आपल्याकडे बाजारपेठेशी निगडित कृषी उद्योग नाहीत. ग्राहकांना दर्जेदार आणि माफक दरात कृषी उत्पादने मिळत नाहीत. आपल्या राज्यात फळे, फुले, भाजीपाला मोठ्या प्रमाणावर पिकतो, परंतु ते योग्य दर्जात आणि वेळेत ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शास्त्रोक्त मूल्यवर्धन साखळी निर्माण करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी त्यांचे उत्पादन मागणीनुसार ठेवावे. जे उत्पादन करू तेच विकू हा आग्रह चुकीचा आहे. ग्राहकांची गरज लक्षात घेऊन उत्पादन करा, असा सल्ला त्यांनी दिला. 

व्यावसायिक दृष्टिकोन गरजेचा : सह्याद्री अॅग्रोचे विलास शिंदे म्हणाले की, मराठवाड्यामध्ये फळशेतीला मोठा वाव आहे. मात्र व्यावसायिक दृष्टिकोनाचा अभाव आहे. त्यामुळे तो अंगीकारण्याची गरज आहे.
 
शेतकरी एकत्र आले तरच ते जगाच्या स्पर्धेत टिकू शकतील, असे मत त्यांनी व्यक्त केले, तर प्रवीण मसालेचे आनंद चोरडिया म्हणाले, ग्राहकांची बदललेली गरज, बदलत्या जीवनशैलीचा अभ्यास करून त्याला अनुसरून उत्पादने तयार करावे.
 
देशांतर्गत बाजारपेठ जगात सर्वात मोठी आहे. ती काबीज करण्याचा प्रयत्न आधी करा, असा सल्ला त्यांनी दिला. मराठे यांनी शासन आणि बँकांमार्फत कृषी क्षेत्राला देण्यात येणारे प्राधान्य आणि विविध योजनांची माहिती दिली.