आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायबर गुन्हेगारीमध्ये पाचपटींनी वाढ, विद्यार्थ्यांचे लक्षणीय प्रमाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- इंटरनेटच्या वाढत्या प्रभावासोबतच सायबर गुन्हेगारीचे प्रमाणही प्रचंड वाढत आहे. संगणकावरील दस्तएेवज चोरी, व्हायरसच्या माध्यमातून धोका पोहोचवणे, बदनामीकारक मजकूर प्रसारित करणे, वैयक्तिक मर्यादांचा भंग करणे, ऑनलाइन फसवणूक इत्यादी प्रकारची सायबर गुन्हेगारी प्रचंड फोफावली आहे. या गुन्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रमाण लक्षणीय ठरत आहे. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश ही राज्ये सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत संपूर्ण देशभरात अग्रेसर आहेत.

राष्ट्रीय गुन्हेगारी रेकॉर्ड विभागाने (एनसीआरबी) नुकताच जारी केलेल्या २०१५ च्या अहवालातून याबाबत धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, २०१५ मध्ये देशभरात ११,५९२ सायबर गुन्हे घडले. विविध प्रकारच्या या गुन्ह्यांप्रकरणी ८,१२१ लोकांना पोलिसांनी भारतीय दंड विधान तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत या वर्षी अटक केली. विशेष म्हणजे यात युवकांची सर्वाधिक ३,१८८ इतकी संख्या आहे. यातील ८१४ युवक, तर महाविद्यालयीन विद्यार्थीच आहेत.

पाचवर्षांत पाचपट वाढ : मागीलपाच वर्षांत स्मार्टफोन, इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर प्रचंड वेगाने वाढला आहे. मात्र, या गतिमान तंत्रज्ञानासोबतच सायबर गुन्हेगारीमध्ये त्यापेक्षा कितीतरी वेगाने वाढ झाल्याचे चित्र आहे. एनसीआरबीनुसार, २०११ मध्ये देशभरात २,२१३ सायबर गुन्ह्यांची नोंद झाली होती. २०१५ मध्ये ही आकडेवारी पाचपटींनी वाढून ११,४६७ वर पोहोचली आहे. २०११ मध्ये या प्रकरणी एकूण १,६३० आरोपींना अटक झाली होती. तर २०१५ मध्ये यातही जवळपास पाचपटींची वाढ होऊन ७,९६९ आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडले.

सरकारी उपाययोजना फोल : गृहमंत्रालयानुसार, सायबर गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी सायबर पोलिस तसेच अद्ययावत चौकशी तंत्रे अस्तित्वात आणली. इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (सीईआरटी), डाटा सिक्युरिटी कौन्सिल ऑफ इंडिया (डीएससीआय), सायबर फॉरेन्सिक प्रयोगशाळा आदींची यासाठी स्थापना करण्यात आली. मुंबई आणि पुण्यातही या प्रयोगशाळा अस्तित्वात आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात यंत्रणा तयार करूनही देशातील सायबर गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहेत.

वर्षांत राज्यात प्रकरणे उघड
एनसीआरबीच्या २०१४ आणि २०१५ या दोन वर्षांच्या सायबर गुन्हेगारी आकडेवारीचा विचार केल्यास महाराष्ट्राची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. देशात मागील दोन वर्षांमध्ये सर्वाधिक सायबर गुन्ह्यांची नोंद महाराष्ट्रात झाली आहे.

भविष्यात सर्वाधिक गुन्हे ‘सायबर’चेच!
इंटरनेट वापरकर्त्यांत सर्वाधिक युवकच आहेत. सर्वच घटनांच्या नोंदी होत नाहीत. मात्र, नोंदी झाल्या तर सर्वाधिक गुन्हे सायबरचेच असतील. महाराष्ट्रात ‘सायबर प्रोजेक्ट’ अंतर्गत सर्वच जिल्ह्यात सायबर प्रयोगशाळांची निर्मिती केलेली आहे. पुढील सहा महिन्यांत सायबर जनजागृतीसाठी मोहिम राबवण्याचा प्रयत्न आहे.
-ब्रिजेश सिंह, पोलिस महासंचालक, सायबर गुन्हे विभाग, महाराष्ट्र

लैंगिक छळ, बदला घेण्याच्या प्रवृत्तीचे गुन्हे
प्रतिष्ठेच्या दृष्टिकोनातून इतरांशी बदला घेण्याची वृत्ती तसेच लैंगिक छळविषयक गुन्ह्यांची २०१५ मध्ये एनसीआरबीकडे सर्वाधिक नोंद झाली आहे. काही ना काही कारणाने इतरांशी बदला घेण्याची देशात एकंदरीत ३०४ प्रकरणे घडली असून यात महाराष्ट्रातील २१ प्रकरणे समाविष्ट आहे. तर, लैंगिक छळाशी संबंधित ५८८ प्रकरणांपैकी तब्बल ११३ एकट्या महाराष्ट्रातील आहेत.
बातम्या आणखी आहेत...