आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल शोधताना सायबरने मिळवले २३ मोठ्या गुन्ह्यांचे धागेदोरे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 औरंगाबाद - मोबाइल चोरीची नोंद घेऊन जमेल तेव्हा तपास करायचा, ही पद्धत पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी बदलली आहे. सायबर विभागाने केवळ मोबाइल शोधण्यापुरतेच मर्यादित न राहता सखोल तपास करावा, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे गेल्या चार महिन्यात १४३ मोबाइलचा तपास लावत असताना २३ मोठ्या गुन्ह्यांतील महत्त्वाचे पुरावेही पोलिसांच्या हाती लागले. शिवाय १३ अट्टल गुन्हेगार गजाआड झाले. अनेक गुन्ह्यांच्या तपासात सायबर विभाग महत्त्वाची भूमिका बजावूनही दुर्लक्षित राहतो. कारण यात काम करणारे अधिकारी कायम पडद्यामागेच राहतात. मोठी घटना घडली तरच या विभागाची मदत घेतली जाते. यादव यांनी सायबरच्या पथकाला मोबाइल चोरीचा शोध घेताना खोलात तपास  करण्याची सूचना केली. त्याचा फायदा पोलिस दलाला होत आहे.
 
 
शोध मोबाइलचा, हाती अट्टल गुन्हेगार 
सायबर विभागाने अलीकडेच मोबाइल ट्रॅकिंग करताना ३६ गुन्हे दाखल असलेला कल्ल्या ऊर्फ कल्ल्या शब्बीर खान पठाणला जेरबंद करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.  कर्णपुरा परिसरात दोघांना लुटणाऱ्या कुख्यात आरोपींना केवळ तीन तासांत अटक करणे सायबर विभागामुळेच शक्य झाले. या विभागाचे पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर म्हणाले की, यापूर्वी आमचे लक्ष्य केवळ मोबाइल चोरीचा शोध लावणे एवढेच होते. आता वेगळ्या पद्धतीने काम होत आहे.
 
 
१५ जणांचे पथक, २४ तास काम
सायबरमध्ये एक निरीक्षक, २ वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १५ जण २४ तास कार्यरत असतात. आरोपींच्या मोबाइलचे सातत्याने लोकेशन शोधण्यासोबत तो कोणाशी बोलत आहे आणि इतर सर्व माहिती संबंधित अधिकारी, विभागाला दिली जाते.
 
 
आधी असे होते...आता असे आहे  
पूर्वी - चोरीस गेलेल्या मोबाइलचा क्रमांक पोलिस ठाण्यांकडून सायबरकडे येत होता. नेटवर्क व मोबाइल कंपनीशी संपर्क साधून मोबाइलचे लोकेशन शोधले जायचे. मात्र, पाठपुराव्याचे प्रमाण 
अत्यल्प होते.
 
 
आता - कंपनीच्या नोडल व झोन अधिकाऱ्यांकडे प्रचंड पाठपुरावा केला जातो.  महत्त्वाचे पुरावे, गुन्ह्यांचे धागेदोरेही विशेष लक्ष देऊन शोधले जातात.
 
 
गुन्ह्यांची उकल करण्यात तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज आहे. 
त्यात मोबाइल हा फार महत्त्वाची भूमिका बजावतो, असे यादव म्हणाले. तर सायबर विभागाचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन लवकरच या विभागाला स्वतंत्र पोलिस ठाण्याचा दर्जा मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 
 
 
- २०१६ - मोबाइल चोरीच्या ६८ तक्रारींचा तर गेल्या ४ महिन्यांत  १४३ मोबाइल चोऱ्यांचा शोध यात प्रामुख्याने घरफोड्यांनी पळवलेल्या मोबाइलचा समावेश.
 
- गेल्या चार महिन्यांत - ४६७ मोबाइल चोरी १४३ परत  मिळाले १६ अट्टल गुन्हेगार अटकेत २३ मोठ्या गुन्ह्यांचे मिळाले धागेदोरे
 
बातम्या आणखी आहेत...