आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायकल घोटाळा: दाखवली एक, दिली दुसरीच सायकल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विद्यार्थिनींना मोफत वाटण्यात आलेल्या सायकलींच्या खरेदीदरम्यान पुरवठादाराने दाखवलेली आणि प्रत्यक्षात दिलेल्या सायकली वेगवेगळ्या असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या सायकलींच्या खरेदीत घोळ असल्याचे समोर आल्यानंतर आजच्या या सायकल वाटप कार्यक्रमावर स्थायी समिती सभापती विजय वाघचौरे व सभागृह नेते किशोर नागरे यांनी बहिष्कार टाकला. प्रत्यक्षात मात्र त्यांनी संपर्क नेत्यांसोबत बैठकीत असल्याचे कारण सांगितले.

महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने आज मनपा शाळांतील विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले. या सायकलींच्या खरेदीत घोळ असल्याचे काल स्थायी समिती सभापतींनी घेतलेल्या माहितीदरम्यान समोर आल्यानंतर मनपात खळबळ उडाली. सभापती वाघचौरे यांनी आज या सायकल खरेदीची फाइल मागवून घेतली. दरम्यान, या प्रकरणाची अधिक माहिती आता समोर येऊ लागली असून पुरवठादाराने मनपाला दाखवलेले सॅम्पल आणि प्रत्यक्षात पुरवठा केलेल्या सायकली यात तफावत आहे. 23 लाखांचे हे काम नगरच्या संजय ट्रेडर्सकडे देण्यात आले होते. हाती आलेल्या माहितीनुसार पुढे बास्केट, चाकांवर ड्रेस अथवा साडीगार्ड असणा-या सायकलीचा नमुना दाखवून मंजूर करण्यात आला होता; पण प्रत्यक्षात वेगळ्याच सायकली पुरवण्यात आल्या. त्यांना ना बास्केट आहे ना साडी गार्ड ना चांगले कॅरिअर. ज्या सायकली देण्यात आल्या त्यांची किंमतही वाढवून देण्यात आली. नमुना दाखवण्यात आलेली सायकल सध्या 4 हजार रुपयांना मिळते, तर प्रत्यक्षात ज्या सायकलींचे वाटप झाले त्यांची बाजारात किंमत 2500 रुपयांच्या आसपास आहे. मनपाने या सायकली 3800 रुपयांना विकत घेतल्या आहेत.

यासंदर्भात उपायुक्त रवींद्र निकम यांनी सांगितले की, आम्हीही बाजारात या सायकलींच्या किमतींची चौकशी केली. ही सायकल बाजारात 2700 रुपयांना उपलब्ध आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल; पण सहा महिन्यांपूर्वीच या सायकली आल्या व आता तर त्याचे वाटपही झाले. कारवाई काय करणार, असा सवाल त्यांनी केला. दुसरीकडे स्थायी समिती सभापती विजय वाघचौरे यांनी सायकलींच्या खरेदीत घोळ झाल्याचा आपल्याला पक्का संशय असल्याचे सांगत या खरेदीची फाइल मागवण्यात आली आहे.

घोटाळ्याची चौकशी करा
सायकल खरेदीत मोठा घोटाळा झाला असून, याची चौकशी करा अशी मागणी राष्‍ट्रवादी विद्यार्थी काँगे्रसने मनपा आयुक्तांकडे केली आहे. आयुक्तांना दिलेल्या निवेदनावर शहराध्यक्ष राहुल तायडे, नीलेश काळे, मंगेश प्रवहाटे, राज चौथमल, आयुतोष चव्हाण, प्रमोद खताळ यांच्या स्वाक्ष-या आहेत.

कार्यक्रमावर बहिष्कार?
काल सायकलींची पाहणी करून खरेदीबाबत असमाधानी असणारे स्थायी समिती सभापती विजय वाघचौरे व सभागृह नेते किशोर नागरे आजच्या सायकल वितरण कार्यक्रमाला हजर नव्हते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी कार्यक्रमाला जाणे टाळले. वाघचौरे यांनी संपर्क नेते विनोद घोसाळकर यांच्यासोबत बैठक असल्याने आम्ही येऊ शकलो नाहीत, असे सांगत बहिष्कार नसल्याचे सांगितले. आज टाऊन हॉलच्या कला दालनात झालेल्या कार्यक्रमात महापौर कला ओझा यांच्या हस्ते सायकलींचे वाटप करण्यात आले. या वेळी उपायुक्त रवींद्र निकम, महिला बालकल्याण सभापती कमल नरोटे, विरोधी पक्षनेते रावसाहेब गायकवाड, नगरसेविका प्रीती तोतला, संजय चौधरी, सुनीता सोनवणे यांची उपस्थिती होती.